खळबळजनक…लॉजमध्ये २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह आणि भेदरलेला प्रियकर

  • by

नाशिकमधील एका हॉटेलमध्ये ठाण्यातील बोईसर येथे राहणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. सीबीएसवरील एका हॉटेलच्या लॉजिंगमधील खोलीत बुधवारी (दि.१३) संध्याकाळी एका २१ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. त्या युवतीसोबत मुक्कामी वास्तव्यास असलेल्या संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत युवतीचा तोंड दाबून खुन केल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तविला आहे.

उपलब्ध माहितीनुसार,शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या सीबीएस सिग्नलजवळील एका हॉटेलच्या रुममध्ये मंगळवारी दुपारी संशयित प्रियकर तन्मय प्रवीण धानवा (२१,रा.मासवन, कोळीपाडा, पालघर) आणि अर्चना सुरेश भोईर (२०,रा. कल्लाले मान, बोईसर) हे युगल मुक्कामी आले होते. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता तन्मय व अर्चनाचे आई,वडीलांसह अन्य नातेवाईक हॉटेलमध्ये अचानकपणे येऊन धडकले. यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य कामगारांनी दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक-२०३ च्या दिशेने धाव घेतली असता खोलीतील पलंगावर अर्चना मृतावस्थेत आढळून आली व तन्मय येथील एका कोपऱ्यात बसलेला होता.

व्यवस्थापकाने सदर घटनेची पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्चनाला तपासून बघितले असता ती मयत झाल्याची खात्री पटली. यावेळी पोलिसांनी तिच्यासोबत थांबलेल्या तन्मयला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिसांनी प्रथमदर्शनी अर्चनाचा तोंड दाबल्यामुळे मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रेयसीच्या खूनाच्या संशयावरुन संशयित प्रियकर तन्मय यास पोलिसांनी अटक केली आहे. मयत अर्चनाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.