यह है मेरा भारत..एक रुपयाही देणगी न घेता ‘ ह्या ‘ मुस्लिम व्यक्तीने उभारले महादेवाचे मंदिर

शेअर करा

देशातील समाजविघातक प्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करण्याचे काम कितीही करत असल्या तरी स्थानिक पातळीवर मात्र हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एकोप्याचे दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना रोज समोर येत असतात, अशातच धुळे तालुक्यातील बिलाडी येथे मुस्लिम समाजातील शेतकरी सांडू सुमन पिंजारी यांनी भगवान महादेवावर प्रचंड श्रद्धा असल्याने स्वखर्चाने गावात कुणाकडूनही एक रुपया देणगी न घेता मोठे महादेवाचे मंदिर उभारले आहे. नुकतीच त्यांनी महादेवाची पिंड, नंदी आणि पार्वतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे .

बिलाडी येथे दहा ते बारा मुस्लिम कुटुंबांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी राहणारे सांडू सुमन पिंजारी हे मुस्लिम समाजातील असून ते शेती करतात. त्यांची दोन्ही मुले ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. त्यांची कौटुंबिक परिस्थिती फार बेताची आहे. सांडू पिंजारी यांची भगवान महादेवावर नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेतून त्यांनी स्वत:च्या शेतात महादेवाचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला. हा संकल्प तडीस नेण्यासाठी त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतात मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. गावातील मुस्लिम व्यक्ती मंदिर उभारत असल्यामुळे अनेकांनी त्यांना मदत करण्यासाठी हात पुढे केले. मात्र, सांडू पिंजारी यांनी कुणाकडूनही मदत न घेता मंदिर उभारले.

गेल्या पाच वर्षांत शेतातून मिळालेले उत्पन्न, मुलांनी केलेल्या आर्थिक मदतीतून त्यांनी या मंदिराचे बांधकाम केले. या मंदिराचे काम नुकतेच पूर्ण झाले. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच या मंदिरात भगवान महादेवाची पिंड, पार्वती आणि नंदी अशा तीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील नागरिकही सहभागी झाले. तसेच रविवारी भंडारा वाटप करण्यात आला. दरम्यान, संपूर्ण पिंजारी कुटुंबाने मंदिरात पूजाविधीही केला.


शेअर करा