कोरोना लस घेतलेल्या ‘ त्या ‘ रुग्णाचा अखेर मृत्यू ,जाणून घ्या साईड इफेक्टस

शेअर करा

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता लसीच्या दुष्परिणामाच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येताना दिसत असून सदर घटना वेळीच आटोक्यात आल्या नाहीत तर लसीकरणावरचा नागरिकाचा विश्वासच उडण्याची शक्यता आहे .उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे कोरोनाची लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना लसीकरणाची सुरुवात केंद्राने घाईघाईने पश्चिम बंगालच्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करण्यात आल्याची टीका देखील या निमित्ताने सोशल मीडियात सुरु झालेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत व्यक्तीचे नाव महिपाल असून ते रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कामाला होते. 16 जानेवारीला महिपाल यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. ही लस घेतल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे ढासळली. त्यानंतर महिपाल यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मात्र दैनिक अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, पोस्ट मार्टेम नंतर महिपाल यांचा मृत्यू हर्ट अटॅकने आणि फुफुस्सातील संक्रमणाने झाला आहे.

महाराष्ट्रात देखील औरंगाबादमध्ये देखील 352 स्वयंसेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती. यापैकी तब्बल 90 जणांना रिअ‍ॅक्शन, ताप, मळमळ आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. काही डॉक्टरांकडूनच स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन लस घेण्यास नकार देण्यात आल्याचा प्रकार देखील समोर आला होता. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला होता.कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे या लसीच्या परिणामकारकतेबद्दल अद्याप साशंकता आहे. मात्र तरीही केंद्र सरकारने या लसीला परवानगी का दिली हा प्रश्न उरतोच ?

सातत्याने मीडिया आणि सरकारकडून दाखवण्यात आलेली कोरोनाची भीती अद्यापही कमी झालेली नसली तरी लोकांची मानसिकता आता रोग परवडला पण लस नको, अशी झाली असून असेच प्रकार यापुढे घडत राहिले तर लसीकरणाचे काम आणखीन अवघड होणार आहे. दुसरे असे की ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाते त्यांनाच धोका निर्माण झाला तर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणायला कौशल्य असलेल्या मनुष्यबळाचा तुटवडा जाणवेल ही गोष्ट वेगळीच.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, ‘ कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन केले आहे. राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन आणि तिसऱ्या टप्प्यात व्याधी असणाऱ्या (को-मॉर्बिडिटी) असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल.

कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस होऊ शकतात?

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.


शेअर करा