शॉक लगा..महावितरणच्या ‘ ह्या ‘ टायमिंगवरून राज्यात महाभारत रंगणार

  • by

राज्यात लॉकडाऊन काळात जास्त वीजबिल आकारल्यामुळे जनतेत आक्रोश असताना आणि विरोधकांनीही यावरुन सरकारला धारेवर धरलेलं असतानाच आता ‘महावितरण’ने देखील थकीत वीजबिल वसुलीसाठी कंबर कसली असल्याने राज्यात नवीन वादास सुरुवात होणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यात वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसुल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश ‘महावितरण’ने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले असल्याने आता राज्यात पुन्हा एकदा विरोधक व सत्ताधारी यात संघर्ष रंगणार आहे. ग्रामपंचायतीचे मतदान झाल्यावर लगेचच हे आदेश देण्यात आल्याने ‘ या ‘ टायमिंगची देखील जोरदार चर्चा आहे .

डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७० कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही, असं ‘महावितरण’कडून जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर मनसेकडून जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाही काढण्यात आला होता. वाढीव वीजबिल माफ केलं जात नाही तोवर राज्यातील जनतेने वीजबिल भरू नये, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं होतं. याशिवाय वीजबिल न भरल्यामुळे कुणी वीज जोडणी कापण्यास आलं तर त्यांच्या कानाखाली ‘शॉक’ देऊ अशी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी धमकी देखील दिली होती.

महावितरणच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनच्या काळात खासगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसुल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला. मात्र उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण होत आहे, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आलेले आहे.