मोठी बातमी.. ‘ ह्या ‘ तारखेपासून अण्णा करणार उपोषण, अशी असेल रणनीती ?

  • by

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी केलेल्या केंद्राकडे केलेल्या पत्रव्यवहाराला कोणतेही उत्तर आले नाही. अण्णा हजारे यांनी उपोषण करावे अशी वेळ केंद्राने त्यांच्यावर आणू नये अशी जनतेची इच्छा होती मात्र अण्णा हजारे यांच्या पत्रव्यवहाराकडे केंद्राने पूर्ण दुर्लक्ष केले, त्यामुळे परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. अण्णांनी याबद्दल राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओही जारी केला आहे.

‘ सत्ता के लिए सत्य को छोडना ठीक नही’… अशा भाषेत व्हिडिओच्या माध्यमांतून भाजपच्या नेत्यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न हजारे यांनी केला आहे. हजारे यांनी २०११ व २०१३ मध्ये केलेल्या आंदोलनाच्यावेळी भाजपचे नेते हजारे यांना पाठिंबा देत होते. त्यांची बाजू घेऊन तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करून हजारे यांच्या मागण्या कशा योग्य आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कसे चुकीचे आहे, अशी भाषणे त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यांचे संकलन हजारे यांनी केले आहे. सत्तेत असताना एक आणि विरोधात असताना एक ह्या भाजपच्या राजकीय दुटप्पीपणाचा अण्णा हजारे आता पर्दाफाश करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर दिल्लीत केंद्र सरकारला आणि मैदानाची परवानगी मिळविण्यासाठी पत्रे देखील पाठवली मात्र पाठविलेल्या पत्रांना केंद्राकडून उत्तर आलेच नाही. त्यामुळे आता दिल्लीला न जाता राळेगणसिद्धी येथेच ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. आता राज्यात आंदोलन होणार असल्याने याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कळविण्यात आली आहे. सरकार आपल्याला दिलेली आश्वासने विसरले आहे, असा अण्णा हजारे यांचा आरोप आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरूच आहे त्यात अण्णा हजारे यांनी उपोषण केल्यास केंद्राच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते मात्र अण्णा हजारे यांना देशातला गोदी बनलेला मीडिया कितपत साथ देईल, यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेस सत्तेत असताना भाजपची मंडळी आणि यंत्रणा देखील अण्णांच्या समर्थनार्थ उभी राहिली होती, आता विरोधी पक्ष अण्णांच्या पाठी किती एकवटतील हे येत्या काळात पाहावे लागेल. केंद्र सरकारला यासाठी हजारे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करावी लागणार आहे, तशी हजारे यांची अपेक्षाही आहे. मधल्या काळात भाजपच्या राज्यातील नेत्यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, हे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने त्या सरकारकडून ठोस उपाय केले जावेत, अशी अण्णांची भूमिका आहे.