अखेर संभाजी बिडीचे नाव बदलले, ‘ हे ‘ आहे नवीन नाव

  • by

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बिडीची विक्री होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडसह इतरही संघटनांकडून केली जात होती. मात्र या मागणीला संबंधित कंपनीकडून काही तांत्रिक कारणांमुळे झटपट प्रतिसाद दिला जात नव्हता. मागील वर्षी कंपनीने नाव बदलण्याची घोषणाही केली केली होती मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नव्हती मात्र आता अखेर संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बिडीची आता ‘साबळे बिडी’ या नावाने विक्री होणार आहे. त्यामुळे ‘संभाजी ब्रिगेड’ सह इतर अनेक संघटनांनी आपल्या लढ्याला यश आलं आहे, असे सांगत विविध संघटनांनी कंपनीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इचलकरंजीत मागील पंधरा दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परत गाड्या अडवल्या होत्या. बिडीला संभाजी महाराजांचे असल्यामुळे ते कुठल्याही ‘शिवप्रेमी’ कार्यकर्त्याला सहन होत नव्हते. त्यामुळे साबळे वाघिरे कंपनीला तात्काळ निर्णय घ्यावा लागला,’ अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिली आहे.

संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी बिडी नावाने विक्री करण्यास व्यापाऱ्यांना देखील भाग पाडले आणि सुमारे 20 लाख रुपयाचा जुना माल कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी साबळे-वाघेरे कंपनीला परत पाठवला. त्यानंतर 10 सप्टेंबर 2020 रोजी साबळे कंपनीने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन नाव बदलणार हे जाहीर केले मात्र जुने नाव असल्याने तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे काही काळ जावा लागला मात्र अखेर संभाजी बिडीविरोधात अकरा-बारा वर्षापासूनच्या लढ्याला यश आलं असून यापुढेही कुठल्याही महापुरुषांच्या नावाचा कोणीही गैरवापर करू नये,असंही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

संभाजी बिडीचं नाव बदलावं, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी या बिडीच्या उत्पादकांवर निषेध, आंदोलने तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देऊन दबाव आणला जात होता. नाव बदलण्याच्या निर्णयामुळे आतापर्यंत संभाजी बिडी या नावाने विकली जाणारी विडी आता साबळे बिडी या नावाने विकली जाणार आहे. विविध शिवप्रेमी संघटना आणि लोकभावनेचा मान राखून आम्ही या उत्पादनाचे नाव बदलले असल्याचे या साबळे-वाघिरे कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी सांगितले.

विविध संघटना आणि जनतेच्या विरोधामुळे संभाजी बिडीची उत्पादक असलेल्या साबळे-वाघिरे कंपनीने या बिडीचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. तसेच हे नाव अचानक बदलता येणार नाही. त्यासाठी काही काळ लागेल, अशी विनंती कंपनीने केली होती. त्यानुसार आता संभाजी बिडीचं नाव बदलून साबळे बिडी असं करण्यात आलं आहे.