धनंजय मुंढे प्रकरण : रेणू शर्माच्या माघारीवर शरद पवार म्हणाले ..

शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबद्दल बोलताना “आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज आहे, असं मी आधीच म्हटलं होतं. सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झालय” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. काही दिवसांपूर्वीच रेणू शर्माने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.

बॉलिवूडमध्ये संधी देतो असं सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप रेणू शर्मा हिनं केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं हे आरोप केले होते. रेणू शर्माच्या मोठी बहीण करुणा शर्मा हिच्यासोबत धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोपही तिनं केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

करुणा शर्मा हिच्याशी संबंध असल्याची कबुली स्वत: मुंडे यांनी दिली होती. तसंच, आपल्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना देखील याची कल्पना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र धनंजय मुंढे यांची मेहुणी असलेल्या रेणू शर्मा हिनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळं ते अडचणीत आले होते. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती मात्र रेणू शर्माच्या दाव्यातील सत्यता शंकास्पद असल्याने राष्ट्रवादीने त्यांना दिलासा दिला होता .

रेणू शर्मा ही एक ब्लॅकमेलर असल्याचा आरोप इतर राजकीय पक्षातील काही नेत्यांनीही केला होता. भाजपचे कृष्णा हेगडे व मनसेचे संतोष धुरी यांनीही तिच्यावर आरोप केले होते. रेणू शर्मा हिनं सतत फोन करून आपल्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार हेगडे यांनी पोलिसांत केली होती. त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. पोलिसांकडून याबाबत सखोल चौकशी सुरू असतानाच रेणू शर्मा हिनं आता सपशेल माघार घेतली आहे.

रेणू शर्मा हिनं तक्रार मागे घेण्याची तयारी दाखवल्यानंतर पोलिसांनी तिला तिचं म्हणणं प्रतिज्ञापत्रावर देण्याच्या सूचना केल्या आहेत. हे प्रतिज्ञापत्र नोटरी करून घेतलं जाणार आहे. भविष्यात तिनं पुन्हा आपली भूमिका बदलू नये म्हणून ही खबरदारी घेतली जात असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. आतापर्यंत भाजपचे कृष्णा हेगडे व मनसेचे संतोष धुरी आणि एअर इंडियाचे एक अधिकारी यांनी देखील रेणूबद्दल अशाच स्वरूपाच्या तक्रारी केल्याने रेणूचे हे प्रकरण तिच्याच अंगलट येऊ शकेल या भीतीतून तिने तक्रार मागे घेतल्याची चर्चा आहे .

तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रेणू शर्मा म्हणते, ‘धनंजय मुंडे आणि माझ्या बहिणीमधील संबंध बिघडले होते. त्यामुळं मी मानसिक तणावात होते. मुंडे यांच्याविरोधात मी केलेल्या तक्रारीचा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी वापर केला जात असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. मी मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेत आहे. माझी बलात्कारासंदर्भात तक्रार नाही.’ रेणू हिच्या ट्विटर हँडलवर मात्र याबद्दल काहीही भाष्य केलेले नसून १५ जानेवारी नंतर रेणू हिने अद्यापपर्यंत तरी कोणतीही पोस्ट टाकलेली दिसत नाही.

“धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोपही धक्कादायक होता आणि ज्यापद्धतीने तक्रार मागे घेतली ते देखील तितकंच धक्कादायक आहे. बलात्काराचा गंभीर आरोप करुन नंतर तक्रार मागे घेतल्यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेल, त्यामुळे खोटे आरोप केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करावी” अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली. “खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असूदे किंवा सामान्य माणूस तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, आणि अशाप्रकारे जर महिला खोटे आरोप-गुन्हे दाखल करत असतील तर त्यामुळे खऱ्या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो…हे समाजाच्या हिताचं नाहीये. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ IPC192 नुसार कारवाई करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.


शेअर करा