फडणवीस, विखे-पाटलांकडून अण्णा हजारेंच्या मनधरणीचे प्रयत्न, अण्णा म्हणाले ..

शेअर करा

केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 58 दिवसांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे मात्र अण्णा आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी इथे जाऊन भेट घेतली. फडवणीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेलं पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलं. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असं अण्णा हजारे म्हणाले.

अण्णा हजारे यांचं मत आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. त्या केंद्र सरकारपुढे मांडणार आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. अण्णांचे विषय मार्गी लागावे ही आमचीही इच्छा आहे. अण्णांच्या पत्राचे उत्तर चर्चा करुन द्यावं लागतं त्यामुळे उत्तर दिलं नाही. अण्णांना उत्तर द्यायचं आहे, असं खुद्द केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितलं असल्याचंही फडणवीस म्हणाले.

स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्यावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आग्रही आहेत. मात्र आधी काँग्रेसने, तर आता भाजपने अण्णांना आश्वासनाच्या पलीकडे काहीही दिलेले नाही, असा आरोप अण्णांनी केलाय. 2011 मध्ये अण्णा दिल्लीत उपोषणाला बसले होते. त्यावेळी संपूर्ण देश अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. २०११ मध्ये भाजप नेत्यांनी अण्णांच्या आंदोलनाचा फायदा घेत आंदोलनाला पाठिंबा दिला, मात्र पुढे सरकार येऊनही भाजपने देखील अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केलं. काही वर्षांपूर्वी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी अण्णा हजारे आता जुने व्हिडीओ प्रसारित करणार आहेत.

आपल्याला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी अण्णांनी एक नवी रणनीती तयार केलीय. यानुसार अण्णा ज्या नेत्यांनी आतापर्यंत विविध आश्वासनं दिली, त्यांचे जुने व्हिडीओ एकत्र करून प्रसारित करणार आहेत. म्हणजेच अण्णा देखील आता राज ठाकरे यांच्या स्टाईलने ‘ लावरे तो व्हिडीओ ’ असं म्हणणार असल्याचं चित्र आहे. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर 30 जानेवारी 2021 रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. काही वर्षांपूर्वी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी अण्णा हजारे आता उपोषण करणार आहेत.


शेअर करा