शरद पवार आझाद मैदानात दाखल तर सिंघू बॉर्डरवर ‘ गोदी मीडिया मुर्दाबाद ‘

शेअर करा

कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. विविध शेतकरी संघटनांसह महाविकास आघाडीतील अनेक पक्षही आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान या आंदोलनावर रामदास आठवले यांनी टीका करताना आझाद मैदानातील आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हटले त्यावरून आठवले यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील मुंबईत आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत.

सोमवारी जाहीर सभेनंतर शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जथा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा देखील ट्रॅक्टर मोर्चा सांगली ते कोल्हापूर निघणार आहे. अशाच स्वरूपाच्या वेगवेगळ्या मोर्चाचे आयोजन राज्यभर करण्यात आलेले असून सर्व शेतकरी मुंबईत दाखल होत आहेत . शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, करोना काळात राज्य सरकारनं स्थगित केलेली महात्मा फुले कर्ज माफी योजना पुन्हा सुरू करावी व वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा आहेत.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वजाचे वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन तसेच शेतकरी-कामगारांचा लढा कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याच्या निर्धारासह कार्यक्रमाची सांगता होईल, असे किसान सभेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाबरोबर मुंबईत धडकलेल्या किसान मोर्चासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त फाैजफाट्यासह ड्रोनच्या मदतीने या मोर्चावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

दुसरीकडे सिंघू बॉर्डरवर शेतकरी गोदी मीडियाच्या दुटप्पी भूमिकेवर संतापलेले पाहायला मिळत असून केवळ बाईट मिळवून त्या बाइटच्या आधारे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे काम गोदी मीडिया करत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे . सिंघू बॉर्डरवर प्रत्येक ट्रॅक्टरवर गोदी मीडिया दूर रहे अशा घोषणा दिल्या जात असून केवळ युट्युब चॅनेल्स व सोशल मीडियातील पत्रकारांनाच आंदोलनात प्रवेश देण्यात येत आहे. बहुतांश इलेक्ट्रॉनिक चॅनेलचे अर्थात गोदी मीडियाच्या पत्रकारांवर चॅनेलचे नाव व वापरता रिपोर्टींग करण्याची वेळ आलेली आहे तर दुसरीकडे आजतक , झी न्यूज, इंडिया टीव्ही तसेच इंग्रजी वाहिन्यांच्या पत्रकाराचे फोटो लावून ‘ गोदी मीडिया मुर्दाबाद ‘ चे होर्डिंग देखील लावलेले आहेत.

अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.शेतकरी आंदोलनाला जनसामान्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहेत तर भाजप वगळता इतर बहुतांश पक्षाचे कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी होत आहेत.


शेअर करा