त्यांना कंगनाला भेटायला वेळ पण…? : शरद पवारांनी घेतला कोश्यारींचा समाचार

शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच शरद पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील टीका केली आहे .“महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही,” असं म्हणत टीका केली.

शरद पवार म्हणाले, “शेतकरी कामगार मोर्चाच्या आयोजकांनी मला सांगितलं की सभेनंतर शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक निवेदन देण्यात येणार आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला असे राज्यपाल भेटले नाही. मुंबईत लाखोंच्या संख्येने येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. असं असताना राज्यपाल गोव्याला गेले. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही. त्यामुळे आता हे निवेदन कुठं द्यायचं काय करायचं याचा विचार करावा लागेल.”

“राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातील कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणजे त्यांनी याला सामोरं जायला हवं होतं. पण त्यांच्यात तेवढी सभ्यता नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण तेही धैर्य त्यांनी दाखवलं नाही. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही,” अशा शब्दात शरद पवार यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे .

विशेष म्हणजे याधी देखील शरद पवार यांनी राज्यपालांच्या वर्तनावर निशाणा साधला होता. राज्यपालांनी त्यांचं कॉफी टेबल बुक प्रकाशित केलं होतं. त्यावरुन पवारांनी राज्यपालांचे वाईटरीत्या कान टोचले होते. शरद पवार यांनी राज्यपालांना याआधी पुस्तकाच्या शिर्षकावरुनच देखील फटकारले होते. तेव्हा शरद पवार यांनी,“ भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद”, अशा खोचक शब्दात उत्तर दिले होते.

निधर्मवादा संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांना कोश्यारी यांनी पत्र लिहले होते त्यावर देखील , ‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फटकारले होते.


शेअर करा