भारतातून सिंगापूर डायरेक्ट तीन देशातून बसने अनोखा प्रवास , कसा आहे मार्ग ?

शेअर करा

एखाद्या गावी जाण्यासाठी आपण बसचा पहिला पर्याय निवडतो मात्र अंतर जास्त असल्यास आपल्याला रेल्वे किंवा परदेशात जायचे झाले तर विमानाने प्रवास करावा लागतो मात्र आता चक्क सिंगापूरला आपल्या भारतातून बसने प्रवास करता येणार आहे. हरियाणातून नुकतीच ही बस ‘ इंडिया ते सिंगापूर ‘ सेवा सुरू झाली आहे. जाणून घेऊया, या अनोख्या प्रवासाबद्दल.

हरियाणामधील गुरुग्राम कंपनीने नुकतीच ‘इंडिया टू सिंगापूर’ साठी बससेवा सुरू केल्याचे जाहीर केले आहे. ही बस तीन देशांतून जाईल. मणिपूरच्या इम्फाल येथून सुरू होणाऱ्या या बससेवेचे तिकीट बुक करण्यासाठी अ‍ॅडव्हेंचर ओव्हरलँड नावाची कंपनी लोकांना आमंत्रित करीत आहे. पहिल्यांदाच सुरू झालेल्या या अनोख्या प्रवासात ही बस म्यानमार, थायलंड आणि मलेशियामार्गे सिंगापूरकडे जाणार आहे.

या प्रवासामध्ये म्यानमारमधील काले आणि यांगून, थायलंडमधील बँकॉक आणि क्राबी आणि क्वालालंपूर यासह अनेक महत्त्वपूर्ण शहरांमधून ही बस जाईल. या प्रवासात केवळ 20 प्रवासी एकाच बसमधून भारत ते सिंगापूर आणि सिंगापूर ते भारत प्रवास करू शकतील. प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्वावर बुकिंग स्वीकारले जाईल आणि या प्रवासासाठी फक्त २० जागा आरक्षित आहेत. एकेरी प्रवास पूर्ण करण्यासाठी बसला सुमारे 20 दिवस लागतील. यापूर्वी अ‍ॅडव्हेंचर ओव्हरलँडने दिल्ली ते लंडन या बससेवेची योजना जाहीर केली होती आणि जगातील सर्वात प्रदीर्घ रोड ट्रिप म्हणून वर्णन केले होते.


शेअर करा