रिहानाने केली भक्तांची गोची.. महाविकास आघाडीच्या ‘ ह्या ‘ मंत्र्याची व्हायरल पोस्ट वाचा

शेअर करा

पॉपस्टार रिहाना हिने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर देशात चांगलेच राजकारण पेटलेले पहायला मिळत आहे . सचिन तेंडुलकर, अजय देवगण, विराट कोहली, लता मंगेशकर, अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांना भाजपकडून निर्देश मिळत असल्याने त्यांचे सगळे ट्विट एकसारखे असल्याचा देखील आरोप केला जात आहे तर दुसरीकडे शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला पाठिंबा मिळू लागला असल्याने भाजप समर्थित ट्विटर ट्रोल्स यांनी पुन्हा ‘ देश आणि राष्ट्रवाद ‘ अशी कारणे पुढे करत शेतकऱ्यांना आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांना देशद्रोही, चिनी वगैरे करणे देत नेहमीप्रमाणे ट्रॉल करायला सुरु केले आहे मात्र याचवेळी ‘ अबकी बार ट्रम्प सरकार ‘ म्हणणाऱ्या मोदी यांनी अमेरिकेत जाऊन तिथल्या राजकारणात देखील लुडबुड केली होती, याचा या मंडळींना विसर पडल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे . शेतकऱ्यांच्या कोंडीला तोंड फोडणाऱ्या पॉपस्टार रिहानाचे कौतुक करताना राष्ट्र्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट लिहलेली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे .

काय आहे जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट ?

मधूर आवाजाची धार.. रॉबिन रियाना फेन्टो, तथा रियाना, ही वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात जन्मलेली एका फेरीवाल्याची मुलगी. लहानपणी ती आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर कपडे विकायची. त्यात वडील मद्यपी. आई सोडून गेलेली. शिवाय रियानाला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होता आणि त्यावर सतत उपचार सुरू होते. रियानाला आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. तिच्या शाळेत तिने गायलेलं गाणं एका अमेरिकन म्युझिक कंपनीच्या मालकाने ऐकून तिला तिथे बोलावली. “म्युझिक ऑफ द सन” हा तिचा पहिला अल्बम २००३ साली प्रसिद्ध झाला तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. तो इतका गाजला आणि खपला की तिथून तिने मागे वळूनच पाहिलं नाही. आज वयाच्या ३२ व्या वर्षी ती अब्जोपती आहे. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत.

आपले जुने दिवस मात्र रियाना विसरलेली नाही. गरीब मुलांना शिक्षण, एड्स आणि कर्करोगाचे रुग्ण यासाठी ती खूप दानधर्म करते. एकूणच दुबळ्या घटकांबद्दलची तिची आस्था, पैसा आणि प्रसिद्धीमुळे संपलेली नाही. दिल्ली , हरयाणा, उत्तर प्रदेश इथे शेतकरी आंदोलनाला चिरडण्यासाठी इंटरनेट बंद ठेवलं आहे. अमेरिकेच्या सीएनएन वृत्तसंस्थेने यावर एक सविस्तर बातमी दिली. तिचा दाखला देऊन, “आपण यावर का बोलत नाही?”, असं ट्वीट तिने काल केलं आणि भारतातील सोशल मीडियावर रान उठवलं.

दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनात, ज्यात सुमारे ६० शेतकरी अद्यापपर्यंत मरण पावले आहेत, त्यावर भारतातील तमाम सेलिब्रिटी तोंडात मिठाची गुळणी धरून बसले असताना, अमेरिकेतली एक प्रख्यात गायिका आवाज उठवते, हे विलक्षण आहे. नव्हे, कित्येकांच्या तोंडात मारणारं आहे.

भक्तांची तर पार गोची झाली. तिला देशद्रोही म्हणता येत नाही की नक्षलवादी. पाकिस्तानात जा म्हणूनही सांगता येत नाही. “तू आमच्या अंतर्गत बाबीत कशाला ढवळाढवळ करतेस” असा दुबळा प्रतिकार काहींनी केला. त्यावर, “अबकी बार ट्रंम्प सरकार” बोंबलत आपले नेते तिथे कशासाठी गेले होते? ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का? अशा तीव्र प्रतिक्रिया स्वाभाविकपणे आल्या.

हा वैश्विकीकरणाचा जमाना आहे. मानवतेशी निगडीत घटनांचे पडसाद आता त्या देशापुरते मर्यादित रहात नाहीत. ते जगभर उमटतात. जॉर्ज फ्लॉईड या काळ्या माणसाची अमेरिकेत पोलिसाकडून हत्या झाल्यानंतर अख्ख्या जगाने गुडघा टेकवून त्याला श्रद्धांजली वाहिली होती. त्यात जो बायडन होते तसेच मैदानावरचे क्रिकेटपटू सुद्धा होते. या नव्या जगात इंटरनेट बंद ठेवणं हा मुस्कटदाबीचाच एक अवतार आहे. दुर्दैवाने भारत आज यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. (आणि आपण ‘डिजिटल इंडिया’ करणार म्हणे). तुम्ही ही मुस्कटदाबी केलीत तरी जगात कुठे ना कुठे तरी आवाज उठणार आणि तुमची नाचक्की होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपला आवाज सुमधूर असला तरी त्याला धार सुद्धा आहे, हे रियानाने दाखवून दिलं. डॉ. जितेंद्र आव्हाड


शेअर करा