दोन मुलांच्या आईचे आळंदीत पुन्हा लग्न मात्र मोबाईलमधून ‘ मोठ्ठा ‘ खुलासा

  • by

विवाह न होणाऱ्या तरुणांकडून पैसे घेऊन बनावट विवाह लावून देणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तब्बल आठ महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांनी अनेक तरुणांना अशा पद्धतीने फसविल्याचे समोर आले असून चौकशीत त्यांचे आणखी कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे.

ज्योती रवींद्र पाटील (वय ३५, रा. केसनंद फाटा, वाघोली), महानंदा तानाजी कासले (वय ३९, रा. काळेपडळ हडपसर), रूपाली सुभाष बनपट्टे (वय ३७), कलावती सुभाष बनपट्टे (वय २५), सारिका संजय गिरी (वय ३३, तिघी रा. वडारवाडी), स्वाती धर्मा साबळे (वय २४ रा. भेकराईनगर हडपसर), मोना नितीन साळुंके (वय २८, रा. महाराष्ट्र बँकेजवळ, मांजरी), पायल गणेश साबळे (वय २८, रा. गडद ता. खेड) आणि विद्या सतीश खंडाळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

उपलब्ध माहितीनुसार, मावळ तालुक्यातील दिवड गावच्या एका तरुणाचा विवाह जमत नसल्याची माहिती आरोपी ज्योतीला मिळाली. त्यानुसार ती त्याच्या घरी गेली. तिच्या ओळखीतील एक मुलगी विवाहासाठी तयार असल्याचे सांगितले. दोन मुलांची आई असलेल्या विद्या खंडाळे हिला तिने विवाहासाठी तयार केले आणि सोनाली जाधव या नावाने तिची तरुणासोबत ओळख करून दिली. या विवाहासाठी पाटील हिने तरुणाकडून दोन लाख ४० हजार रुपये घेतले.

काही दिवसांनी ज्योती हिने त्यांचा आळंदी येथे विवाह लावून दिला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सोमवारी विद्या खंडाळे माहेरी जाणार होती. तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी ज्योती येणार होती. मात्र एकदंरीत विद्या हिच्या वागण्यावरून तरुणाच्या कुटुंबीयांना विद्या हिचा संशय आला. त्या वेळी तरुणाच्या कुटुंबीयांनी तिची अधिक माहिती काढली असता, विद्याला दोन मुले असल्याचे समजले. तिच्या मोबाईलमध्ये पैसे आणि दागिने घेऊन पळून येण्याचा उल्लेख येताच सासरची मंडळी हादरली आणि त्यांनी विद्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून या प्रकरणात गुंतलेल्या महिलांना ताब्यात घेऊन वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ज्योती पाटील टोळीप्रमुख होती. ज्योती विवाह जमत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी संपर्क साधत असे. त्यानंतर त्यांच्याकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन टोळीतील एका महिलेला त्याच्याशी विवाह करण्यासाठी तयार करायची. विवाह झाल्यानंतर संबंधित तरुणी सहा ते सात दिवस सासरी राहत असे. त्यानंतर अगोदर ठरल्याप्रमाणे ती तरुणी सासरच्या घरातील सर्व दागदागिने चोरून माहेरी जायची आणि मग मग सासरी जाण्यास नकार द्यायची. अशाप्रकारे काही जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, समाजातील प्रतिष्ठेपोटी हे नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.