आठ जणांची हत्या करुन आश्रमात राहणाऱ्या भोंदू बाबाचे ‘ बिंग ‘ फुटले, कुठे घडलाय प्रकार ?

  • by

एखादा चोर आपली सर्व गुन्हेगारी कृत्य करुन पसार होतो आणि दुसऱ्याच राज्यात तो एकदम ‘धर्मात्मा’ बनतो. तिथं साधू बनलेल्या या बाबाचा भलताच थाट असतो. त्याचा भक्त संप्रदाय वाढतो. अनेक बडी मंडळी देखील त्या बाबाच्या दरबारात हजेरी लावतात. पण अखेर ‘कानून के हाथ लंबे होते है ’ या म्हणीप्रमाणे त्याचे बिंग फुटते आणि त्या खूनी बाबाला अटक होते. एखाद्या सिनेमात अगदी फिट्ट बसेल अशी कथा प्रत्यक्षात घडली असून गुजरातमधून या भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संजीव कुमार असं या भोंदू बाबाचं नाव आहे. कुमारनं त्याची बायको सोनियाच्या मदतीनं सासरे आणि माजी आमदार रेलू राम पुनिया यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांची 2001 साली हत्या केली होती. या प्रकरणात त्याला सुरुवातीला फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर 2004 साली या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं होतं. संजीव कुमारची 2018 साली पॅरोलवर सुटका झाली होती. त्यानंतर तो फरार झाला आणि गुजरात इथे अमरेलीमध्ये येऊन लपला.

संजीव कुमारनं जेलमधून फरार झाल्यानंतर गुजरातमधील राजूला तालुक्यात असलेल्या आनंदयोग आश्रमाचा आश्रय घेतला होता. या आश्रमात कुमारनं ‘आनंदगिरी महाराज’ हे नाव धारण केलं होतं. तेथील भाविक संत समजून त्याची देखील पूजा करत असत. राजूला तालुक्यातील स्थानिक संत खांडेश्वरी बापू यांच्या नावाचा हा आश्रम आहे.

संत खांडेश्वरी बापू यांच्या निधनानंतरही त्यांचा भक्त संप्रदाय कमी झालेला नाही. सुमारे 20 वर्ष जुन्या या आश्रमात भक्तांची मोठी गर्दी असते. भक्तांच्या याच गर्दीचा आपल्याला फायदा मिळेल अशी कुमारची समजूत होती. कुमार दरवर्षी आश्रमात कृषी संमेलन भरवत असे. मागील वर्षी झालेल्या कृषी संमेलनात त्यानं चक्क गुजरातच्या राज्यपालांना देखील निमंत्रण दिलं होतं. कुमार गुजरातमध्ये लपून बसल्याचा संशय हरयाणा पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांचा गुजरातमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये तपास सुरू होता मात्र अखेर त्याला धरण्यात यश आले.