शुभम टेलर्स पुणे ४६ : ‘ त्या ‘ शीर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपी जेरबंद

  • by

पोलिसांनी चिकाटीने तपास केला तर आरोपींनी कोणताही पुरावा न सोडलेल्या गुन्ह्यांचाही तपास लागू शकतो हे श्रीगोंदा पोलिसांनी सिद्ध केले असून अत्यंत कठीण अशा गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ह्या मृतदेहाचे शीर देखील गायब होते मात्र मृतदेहाच्या शर्टावरील टेलर मार्कच्या आधारे ओळख पटवली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले. दुसऱ्या जिल्ह्यात याचे धागेदोरे आढळताच तेथील यंत्रणा देखील सतर्क झाली आणि आरोपी गजाआड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारात ८ फेब्रुवारीला शिर कापलेल्या अवस्थेतील पुरुषाचा पुरलेला मृतदेह आढळून आला. पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांच्या पथकाने हा आव्हानात्मक तपास सुरू केला. मृतदेह कुजला होता. शिर नसल्याने ओळख पटवणेही अवघड झालेले होते अशा परिस्थितीत मृतदेहाच्या शर्टावर टेलरचे शुभम टेलर्स, पुणे ४६ एवढेच नाव त्यावर होते.

एवढ्याच जुजबी माहितीवर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. परिसरातील मोबाइल टॉवरवरून डेटा घेतला. त्याचे विश्लेषण करण्यात आले. पोलिसांनी पुण्यात जाऊन हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी मिळविल्या. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मिळतीजुळती नोंद आढळून आली. रमेश सदाशिव जाधव (रा. आंबेगाव, जि. पुणे) हे २ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची नोंद होती. त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्यावर ते शुभम टेलर्सकडूनच कपडे शिवून घेत असल्याचे समजले. त्यानंतर नातेवाइकांकडून मृताची ओळख पटविण्यात यश आले.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला. त्यासाठी मोबाइल टॉवरवरून मिळालेल्या माहितीचा उपयोग झाला. पुणे जिल्ह्यातील जे संशयित या भागात येऊन गेल्याचे आढळले, त्यांच्याकडे चौकशी सुरू झाली. बारामती, पाटण सातारा, कोळसेवाडी, कल्याण येथून तेजस भोसले, राजेश विठ्ठल गायकवाड, अमोल गोविंद कांबळे, प्रशांत बजरंग साबळे यांच्यासह एका महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. मृत जाधव हा एका महिलेला शारीरिक संबंधासाठी त्रास देत असल्याने कट रचून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.

रमेश जाधव याला जमीन दाखवण्याच्या बहाण्याने बारामती तालुक्यातील मळेगाव येथे बोलवण्यात आले आणि रात्रीच त्याला सिद्धटेकमार्गे श्रीगोंदा तालुक्यात आणले. तेथे धारदार शस्त्राने त्याचा खून केला. त्याचे शिर धडावेगळे करून पुरले. दुसऱ्या दिवशी आरोपींनी ते शिर पुन्हा बाहेर काढून जाळून टाकले. ओळख पटू नये यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच दिलीप तेजनकर, विठ्ठल पाटील, अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, दादा टाके, किरण बोराडे, अमोल कोतकर, विनायक जाधव, संजय काळे, गोकुळ इंगवले, राजु भोर, किरण जाधव, प्रशांत राठोड यांच्या पथकाने हा तपास केला. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या पथकाचे कौतुक केले. अवघ्या चारच दिवसात हा तपास पूर्ण केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.