‘ चप्पे चप्पे पे पुलिस ‘ कोरोनासाठी नगरमध्ये यंत्रणेने कंबर कसली, जिल्हाधिकारी काय म्हणाले ?

  • by

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर शहरातील आरोग्य यंत्रणा देखील पुन्हा सक्रिय झालेली असून व्यावसायिक, दुकानदार आणि फेरीवाल्यांची देखील जागेवर जाऊन कोरोना चाचणी केली जाणार आहे, यासाठी भरारी पथके कार्यान्वित केली जाणार आहेत. दरम्यान आज पासून नगर शहरात चौकाचौकांमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईस सुरुवात झालेली आहे.

कोरोना पूर्णतः नष्ट झालेला नाही मात्र त्यामुळे गाफील राहणे आणखीनच घातक ठरू शकते. ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकांमध्ये मास्क न लावणे तसेच गर्दी होताना ठिकठिकाणी आढळून येत आहे. लॉकडाउन टाळायचे असेल तर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नागरिकांना केले आहे

कोरोना परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. जारी केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले म्हणाले, ‘ राज्यात विदर्भातील अमरावती, वर्धा तसेच पुणे- मुंबई परिसरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न होत आहे या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता साशंकता निर्माण होणे सहाजिक आहे याचे भान बाळगून जिल्हा प्रशासन सतर्क झालेले आहे. लग्नसोहळ्यात गर्दी होत असल्याने प्रशासनाने मंगल कार्यालय संचालकांची बैठक घेत निर्देश दिले आहेत. निश्चित प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळली तर तहसीलदार उपविभागीय अधिकारी महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रशासनास कारवाई संदर्भातचे आदेश जारी केले आहेत. ‘

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले,’ मर्यादेपेक्षा लग्नसमारंभात जास्त गर्दी आढळली तर कार्यालयाचा परवाना रद्द करीत दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रतिबंध प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणीची अधिकाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे नागरिकांनी देखील परिस्थितीचे भान बाळगून मास्कचा वापर करावा अनावश्यक गर्दी टाळावी तसेच कारवाईची वेळ प्रशासनावर येऊ नये याची दक्षता घ्यावी’

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मात्र तरीदेखील सोशल डिस्टंसिंगचे नियम नागरिकांकडून पाळले जात नसल्याने यंत्रणा रस्त्यावर उतरली असून नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील दुकाने मॉल हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्या इत्यादी ठिकाणी गर्दी होत असून या व्यवसायिकांची देखील कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. सर्वप्रथम या व्यावसायिकांची कोरोना चाचणी करून रुग्णांना होम क्वारंटाईनची परवानगी देखील दिली जाणार नाही, असेही समजते

नगर शहरातील शासकीय तंत्रनिकेतन, आनंद लॉन, नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डिंग आणि जिल्हा रुग्णालय हे पाच कोरोना सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहेत तर शासकीय कर्मचाऱ्यांना देखील मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरल्यास अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. शहरातील 4805 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आलेली असून इतर देखील 566 कामगारांना लस देण्यात आलेली आहे.