दारू पाजून भाजपच्या पदाधिकाऱ्याचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, कुठे घडली घटना ?

  • by

पश्चिम बंगालमध्ये भाजपची पदाधिकारी पामेला गोस्वामी हिच्याकडे कोकेन सापडल्याची बातमी येते न येते तोच भाजपच्या अडचणीत भर घालणारी आणखी एक बातमी मध्य प्रदेशमधून आली आहे. मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एका 20 वर्षीय तरुणीवर भाजप पदाधिकाऱ्यासह चार जणांनी सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी रविवारी दिली आहे आणि त्यानंतर आरोपी विजय त्रिपाठी याला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुकेश वैश्य यांनी सांगितलं, की तरुणीचं अपहरण करुन तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तरुणीला जबरदस्तीनं दारु पाजली आणि 18 तसंच 19 फेब्रुवारीला तिच्यावर बलात्कार केला.

मुकेश वैश्य पुढे म्हणाले ,’ या घटनेनंतर आरोपी 20 फेब्रुवारीला पीडितेला तिच्या घरासमोर गंभीर अवस्थेत फेकून गेले. यानंतर पीडितेनं रविवारी 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चारही आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चारही आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत.

शहडोल जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष कमल प्रताप सिंह म्हणाले की , ‘ याप्रकरणी विजय त्रिपाठीचं नाम समोर आल्यानंतर तात्काळ त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे आणि पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे.अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजपला गरज नाही त्यामुळे विजय त्रिपाठीला जैतपूर भाजपच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे’ .