१० महिन्याच्या बाळालाही सोडले नाही, काय आहे शबनम प्रकरण नक्की ?

शेअर करा

स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला असलेल्या शबनमसाठी आता विविध क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शबनमची फाशी रद्द करावी म्हणून महंत परमहंस यांनी पुढाकार घेतला आहे. हिंदू धर्मग्रंथात स्त्रीला पुरुषांपेक्षा महत्त्वाचे स्थान आहे. स्त्रीच्या मृत्यूचा फायदा समाजाला होणार नाही. तसे झाल्यास तुम्ही दुर्दैवी आपत्तींना तोंड द्याल. शबनमचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. परंतु एक स्त्री म्हणून तिची फाशीची शिक्षा मागे घेतली पाहिजे, असे देखील महंत परमहंस पुढे म्हणाले.

महंत परमहंस यांनी सोमवारी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शबनमच्या दया याचिकेचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शबनमने तुरुंगात राहून गुन्ह्याचे प्रायश्चित भोगले आहे. तिला फाशी देण्यात आली तर तो भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण क्षण असेल. ‘ असेही महंतांनी पुढे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच शबनमच्या मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या आईची फाशीची शिक्षा माफ करण्याची विनंती केली होती.

उत्तर प्रदेशात महिलांना फाशी देण्यासाठी केवळ एकच वधस्तंभ आहे. हे ठिकाण मथुरेत आहे. शबनमला फाशी देण्यासाठी औपचारिक प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे फाशीची तारीख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. मात्र डेथ वॉरंट जाहीर झाल्यानंतर शबनमला लगेच फाशी दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ तुरुंग अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिली.

शबनमला फाशीची शिक्षा का झाली ?

शबनम ही स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा देण्यात येणारी पहिली महिला ठरणार असून 2008 साली शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने सात नातेवाईकांची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्दयीपणे हत्या केली होती. यामध्ये 10 महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. शबनम हिने कुऱ्हाडीने या सातही जणांचे शीर धडावेगळे केले. तिचा हा क्रूरपणा पाहून सर्वोच्च न्यायालयानेही शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यास नकार दिला होता. तिने व तिच्या प्रियकराने केलेले हे अमानुष कृत्य पाहून न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे.

सुरुवातीच्या काळात सलीमला भेटता यावे म्हणून शबनम आपल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देत होती. घरचे लोक गाढ झोपल्यावर सलीम आणि शबनम घराच्या छतावर एकमेकांना भेटत होते. शबनम गावातील सलीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र, हे संबंध तिच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरच्यांनी शबनमला सलीमशी संबंध तोडायला सांगितले. मात्र थोड्याच दिवसांमध्ये या दोघांनी घरच्यांना ठार मारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.

14 एप्रिल 2008 च्या रात्री शबनमने सलीमला घरी बोलावले. त्यावेळी शबनमचे कुटुंबीय झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे गाढ झोपले होते. शबनम आणि सलीम ( तिचा प्रियकर ) ने झोपेतच या सगळ्यांवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी शबनमची एक लांबची बहीण राबिया हीदेखील त्यांच्या घरी आली होती. शबनमने तिलाहा ठार मारले. एवढेच नव्हे तर अवघ्या 10 महिन्यांच्या अर्श या बाळालाही शबनमने सोडले नाही. तिने कुऱ्हाडीचा घाव घालून या बाळाचे मुंडके छाटले.


शेअर करा