पुण्यात प्रशासन रस्त्यावर, वैशाली आणि गुडलकसह 47 हॉटेलांवर कारवाई : पूर्ण बातमी

  • by

पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यांत अनेक ठिकाणी कोरोनारुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात Covid-19 ची दुसरी लाट येते का अशी चिन्हं आहेत. प्रशासनाने पुन्हा एकदा निर्बंध कडक करत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कसह इतर नियम लागू केले आहेत. पण पुण्यासारख्या शहरात अजूनही लोक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. पुणे प्रशासनाने आक्रमक करवाईला सुरुवात केली आहे.

नियमापेक्षा अधिक माणसांना प्रवेश दिला म्हणून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई करत काही हॉटेलांना दंड लावला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरच्या प्रसिद्ध वैशाली रेस्टॉरंटचा यामध्ये समावेश आहे. वैशाली, गुडलकसह पुण्यातल्या 47 हॉटेल्सवर प्रत्येकी 5000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात कोरोना बळावत असल्याने आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत नियम अधिक कठोर केल्याचं रविवारीच सांगितलं होतं. पुण्यात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ठरलेल्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांना एका वेळी प्रवेश देता येणार नाही.

काय आहे पुण्यातले नवीन नियम ?

  • शहरात रात्री 11 वाजल्यानंतर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
  • 28 फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार असून कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहे.
  • स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यात येणार आहे.
  • पुण्यात उद्यापासून रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.