लाचखोर नरसिंह पैठणकरला जामीन मंजूर मात्र दर सोमवारी ‘ हे ‘ काम करावे लागणार

  • by

अडीच लाख रुपयांची लाच घेणारा महापालिकेतील उप आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर याला जिल्हा न्यायालयाने 25 हजार रुपयांचा जामीन व दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी या अटी व शर्ती वर सोमवारी जामीन मंजूर केला आहे. यावेळी सरकारी पक्षाकडून एडव्होकेट अर्जुन पवार यांनी युक्तिवाद केला.

नरसिंह पैठणकर याला 17 फेब्रुवारी रोजी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका प्रकल्प चालकाकडून अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ धरले होते। याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जिल्हा न्यायालयाने 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पैठणकर यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिलारे यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने पैठणकर याचा जामीन मंजूर केला आहे याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधकविभागाचे उपअधीक्षक हरीश खेडकर पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

अहमदनगर महापालिकेचा आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नरसिंह सार्वेत्तमराव पैठणकर (वय ४२) याला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक पथकाने सावेडीतील कचरा डेपोतील कार्यालयात काल सकाळी ही कारवाई केली होती. लाच घेण्यास सोकावलेल्या पैठणकर याच्यावर याआधी देखील निलंबनाची कारवाई झाली होती मात्र वरिष्ठांची ‘ मर्जी सांभाळत ‘ तो पुन्हा सेवेत रुजू झाला होता मात्र वर्तनात काहीच बदल झाला नाही आणि आणि अखेर त्याला रंगेहाथ धरण्यात आले होते.

अहमदनगर महापालिकेचा मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रकल्प आहे. तक्रारदार ठेकेदाराने हे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी पैठणकर याने पाच लाख रुपये मागितले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी काही प्रशासकीय पातळीवर त्रुटींचा अडथळा होता, तो दूर करण्यासाठी पैठणकर याने पाच लाख मागितले होते. त्यातील अडीच लाख रुपये स्वीकारताना पैठणकर याला नाशिकच्या पथकाने ताब्यात घेतले. नाशिकचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

नरसिंह पैठणकर याच्याकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कारभार होता. या विभागाच्या कारभारात हलगर्जीपणाचा केल्याचा पैठणकर याच्यावर ठपका होता. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पैठणकर याला जून २०१९ मध्ये निलंबित केले होते. शहरातील घनकचरा संकलन, हरित लवाद्याकडील सुनावणीला गैरहजर राहणे, स्वच्छ अभियानात घसरलेले मानांकन, शौचालयांची प्रलंबित कामे, प्लास्टिक वापरावर न होणारी कारवाई, प्लॉस्टिक विल्हेवाटसाठी आराखडा सादर न करणे, यावर प्रदूषण मंडळाकडून आयुक्तांना आलेली नोटीस, सावेडी कचरा डेपोला लागलेली आग अशा कारणांमुळे पैठणकर याच्यावर त्यावेळी देखील निलंबनाची कारवाई झाली होती.

नरसिंह पैठणकर हा काही एकटाच नसून त्याचे बोलविते धनी मात्र अद्याप पडद्याआडच असल्याची नगर शहरात चर्चा आहे. नगर महापालिकेच्या नगररचना यासहित इतरही बहुतांश विभागात जिथे जिथे काही सापडेल, ते ते खाण्याकडे अधिकारी आणि कर्मचारी यांचे लक्ष असते. नवीन आलेला माणूस हे यांचे सोपे सावज असल्याने जिथे जमेल तिथे ओरबाडून त्याला लुटले जाते. वैयक्तीक नवीन बांधकाम प्लॅन असो किंवा अपार्टमेंट स्कीम पैसे दिल्याशिवाय महापालिकेत काम होत नाहीत अशी नागरिकांची ओरड असून अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी खमक्या आणि पूर्णवेळ आयुक्तांची गरज आहे मात्र सध्या पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने प्रशासन अश्या अधिकाऱ्यांवर कसा लगाम कसते ? ते पाहावे लागेल.