चंद्रकांत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ‘ हा ‘ दिग्गज नेता काँग्रेसमध्ये दाखल

शेअर करा

कोल्हापुरातील भाजपच्या दिग्गज नेत्याने काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोपाळराव पाटील असे त्यांचे नाव असून पाटील यांनी अवघ्या तीन वर्षात भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या होत्या

विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच गळतीला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चंदगड तालुक्यातील भाजपवासी झालेल्या गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती धरला. तीन वर्षांपूर्वी गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याची नाराजी गोपाळरावांनी व्यक्त केली होती. ते गेल्या दिवसांपासून नाराज होते.

गोपाळराव पाटील यांचे चंदगडमध्ये मोठे राजकीय प्रस्थ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट देण्यात येईल असे, असे भाजपने आश्वासन दिल्याचा दावा गोपाळराव यांनी केला. मात्र ऐनवेळी भाजपने शिवाजी पाटील यांना तिकीट देऊन गोपाळराव यांना डावलल्याचंही त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात आहे

पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही गोपाळराव समर्थकांकडून होत आहे. तसेच भाजपमध्ये योग्य सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून नाराजी होती.अखेर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


शेअर करा