लस टोचणाऱ्या नर्सच्या धर्मावरून प्रकाश आंबेडकरांचा मोदींना ‘ असाही ‘ टोला

  • by

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीतील एम्स येथे करोना लशीचा पहिला डोस घेतला. हा डोस घेतल्यानंतर मोदी यांनी आपला फोटो ट्विट करत डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांची प्रशंसा केली. त्यानंतर त्यांनी देशाला करोनामुक्त करण्याचे आवाहन लस घेणाऱ्या नागरिकांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस टोचणाऱ्या नर्सच्या धर्मावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदी यांना चिमटा काढला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आल्या दिवसाला हिंदूनिष्ठेचे ढोल बडवत असतात. मात्र त्यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास आहे असे दिसत नाही. म्हणूनच त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून लस टोचून घेतली. हे काय वर्तन आहे.’

https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1366328328504811526

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पी. निवेदा आणि रोसामा अनिल या एम्सच्या परिचारिकांनी करोनाची लस टोचली. परिचारिका पी. निवेदा या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत, तर परिचारिका रोसामा अनिल या केरळच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस दिलेली असून त्यांना पुढचा डोस आम्ही २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे.

पी. निवेदा यांनी, ” मी एम्समध्ये गेल्या वर्षभरापासून काम करत आहे. पंतप्रधान येणार असल्याची माहिती आम्हाला सकाळीच मिळाली. त्यानंतर पंतप्रधानांना लस देण्यासाठी मला बोलावण्यात आले. तेव्हा आम्हाला पंतप्रधान लस घेण्यासाठी आले असल्याचे समजले ” असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ मार्चला सकाळी लवकर साडेसहा वाजताच राजधानी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स येथे येऊन कोरोनाची लस घेतली. दरम्यान पंतप्रधानांना लसीकरण देण्यासाठी दोन नर्सेसची नियुक्ती करण्यात आली होती. मोदी आल्यानंतर लस देत असताना मोदींनी नर्सेसमोर असा काही विनोद केला की त्यांना देखील हसू आवरले नाही आणि आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले . ‘ राजकारण्यांची कातडी जाड असल्याने तुम्ही माझ्यासाठी दुसऱ्या जनावरांची सुई तर वापरणार नाही ना ? ‘ अशी विचारणा मोदींनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. टीव्ही ९ मराठीने याबद्दल वृत्त दिले आहे.

एम्समध्ये देशाचे पंतप्रधान कोरोना लसीकरण करण्यासाठी येणार असल्याने रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा सतर्क होती. त्यामुळेच मोदी सकाळी येण्याआधीपासूनच रुग्णालयातील नर्सेस काहीशा तणावात हजर होत्या. हे मोदींच्या लक्षात आलं. त्यांनी तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलायला सुरुवात केली आणि नर्सेला हसवण्यासाठी त्यांनी राजकारण्यांवरच विनोद केला.