ब्रेकिंग..फडणवीस यांच्यासोबत मुनगंटीवार, चित्रा वाघ, भातखळकरांविरोधात गुन्हा दाखल

शेअर करा

पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपच्या राज्यातील बड्या बड्या नेत्यांची नावं घेण्यात आली आहे. त्यात विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

भाजपच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि तपासात अडथळा निर्माण केला. तसंच कोर्टाच्या निर्णयाची पायमल्ली करत एका स्त्रीची संपूर्ण भारतात जाणून बुजून बदनामी करणाऱ्या संबंधित भाजप नेत्यांवर आणि प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

मनोरा पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नावं घेण्यात आली आहे. भाजप नेत्यांनी पीडित पूजा चव्हाणचे चारित्र्य हनन केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. बंजारा परिषदेने केलेल्या या तक्रारीनुसार मनोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणावरुन भाजप नेत्यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला होता. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला एक शब्दही बोलू देणार नाही, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तर भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला होता. भाजपच्या अन्य नेत्यांनीही या प्रकरणी सरकारवर हल्ले सुरुच ठेवले होते. त्यामुळे सरकारची आणि पर्यायानं शिवसेनेची होणारी नाचक्की रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे बंजारा समाजाच्या लोकांमध्ये भाजपच्या विरोधात मोठी नाराजी आहे .

काल राजीनामा घेतल्यानंतर बीड इथे बंजारा समाजातील युवकांनी एकत्र येत भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या त्यानंतर आज हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे खापर बंजारा समाजातील लोकांनी आणि राठोड समर्थकांनी भाजपवर फोडलं आहे. येणाऱ्या काळात भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराच बंजारा समाजातील राठोड समर्थकांनी दिला आहे.भाजप नेत्यांमुळेच बंजारा समाजातील नेतृत्वाला राजीनामा देण्याची वेळ आल्याचा आरोप राठोड समर्थकांनी केला आहे.

पोहरादेवी गडाच्या महंतांनी, ‘ राजकीय दबाव टाकून राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला गेल्यास बंजारा समाजात असंतोष निर्माण होईल. उद्या या असंतोषाचं उद्रेकात रुपांतर झालं तर त्याला भाजपच जबाबदार राहील. चौकशी न होताच राजीनामा घेण्याचा चुकीचा पायंडा पडू नये, अशी मागणी केली होती मात्र राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच अडचणीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.


शेअर करा