‘ त्या ‘ फोटोंवरून चित्रा वाघ कडाडल्या, पोलिसात दाखल केली तक्रार

  • by

चित्रा वाघ यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन फोटो मॉर्फिंग प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली. चित्रा वाघ यांचे संजय राठोड यांच्यासोबत मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि शिवसेना नेते संजय राठोड एकमेकांच्या जवळ उभे असल्याचं दिसत होतं. प्रत्यक्षात चित्रा वाघ आणि त्यांचे पती किशोर वाघ यांचा जुना फोटो मॉर्फ करून हा प्रकार करण्यात आला होता. चित्रा वाघ यांनी त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही यासंदर्भात चित्रा वाघ यांनी कल्पना दिलेली आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

मॉर्फ केलेल्या फोटोवर चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

“माझे खासगी फोटो काढून मॉर्फ करुन तुम्ही काय साध्य करणार आहात? किंवा तुम्हाला काय साध्य करायचंय? मिनिटा मिनिटाला फोन करुन मला त्रास दिला जातोय. मला काम करता येत नाहीय. या संदर्भात सर्व सीजींपासून डीजीपर्यंत सर्वांना फोटो पाठवले आहेत. इतका त्रास देण्याचं काय कारण आहे ? . तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. पण जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार”

“तुम्ही मला कितीही त्रास दिला, माझे आणखी काही फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले, कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला काहीच फरक पडत नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे. माझ्या नवऱ्याला काही नसताना अडकवण्याचे षडयंत्र रचले जात असून खरे गुन्हेगार अद्यापही मोकाट का आहेत ? याचे उत्तर पोलिसांकडून अपेक्षित आहे “

देवेंद्र फडणवीस या मुद्द्यावर नेमकं काय म्हणाले?

“सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला

काय आहे एकंदरीत प्रकरण ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवत आहेत. संजय राठोड यांचं नाव घेत त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यानंतर राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलेला आहे . भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडालीय. त्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड एकदम जवळ उभे दिसत आहेत. चित्रा वाघ यांनी आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केलीय.