अजित पवारांनी ‘ मोजक्या ‘ दोनच ओळीत विरोधकांची हवाच काढून घेतली

शेअर करा

मुंबईत आज अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधी पक्षाच्या आमदारांच्या गदारोळाने सुरू झाला. अगदी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते विधान भवनाच्या पायऱ्या आणि शेवटी दोन्ही सभागृह दणाणून सोडण्यासाठी विरोधी पक्षाने जोरदार तयारी केली होती. हातातले फलक ते कृषी पंप आणि वीज कनेक्शन तोडलेले वीज मीटर घेऊन विरोधी पक्षाचे आमदार तयारीनेच आले होते. मात्र अजित पवार यांच्या ‘ अशा ‘ काही अचानक निर्णयाची त्यांना अपेक्षा नव्हती मात्र अजित पवार यांनी तो निर्णय जाहीर करताच विरोधकांच्या घेरण्यामधील हवाच निघून गेली .

दोन्ही सभागृहात वीजबील दरवाढ आणि कट केलेले वीज मीटर कनेक्शन यावरच आक्रमकपणे गोंधळ घालण्यासाठी सर्व भाजप आमदार सभागृहात आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वीज दरवाढ आणि तोडलेले वीज मीटर कनेक्शन यावर सरकारवर हल्ला चढवायला सुरुवात केली. समोर सत्ताधारी बाकांवर बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं शांतपणे आधी ऐकून घेतले.

देवेंद्र फडणवीस यांना उर्जामंत्री नितीन राऊत उत्तर देतील असं सर्वांना वाटत होतं. पण नितीन राऊत यांच्या आधी थेट उपमुख्यमंत्रीच उत्तर देण्यासाठी उभे राहीले आणि अवघ्या काही सेकंदातच त्यांनी “विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडणार नाही”, असा निर्णय जाहीर केला. ज्यासाठी त्यांनी आठवडाभर आधीपासूनच जोरदार तयारी केली होती अशा विरोधी पक्षांच्या तयारीची हवा अजित पवार यांच्या या निर्णयामुळे निघून गेल्याचे सभागृहात पाहायला मिळाले.

त्यामुळे विधान भवनात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या खेळीची चर्चा चांगलीच रंगली होती. अजित पवार हे आपल्या सडेतोड स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. आज विरोधकांनाही त्याचा चांगलाच अनुभव आल्याचं त्यांनी आधी निदर्शनासाठी आणलेल्या आणि काही वेळातच परत पाठवायला लागलेल्या फलकांवरून दिसून आलं.


शेअर करा