‘ सरकारी माणूस ’ आहे सांगून भामटा रुग्णालये गाठायचा मात्र अखेर शिर्डीत धरला

  • by

गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. मात्र, त्याच आधारे रुग्णांची फसवणूक करण्याचे प्रकार पुढे येत आहेत. असाच एक प्रकार शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उघडकीस आला आहे. आपण ‘शासनाचा माणूस’ असल्याचे सांगत एकाने रुग्णाची फसवणूक केली मात्र नंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो पकडला गेला. त्याने याच मार्गाने इतरांना देखील गंडा घातल्याचे तपासात आढळून आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, शिर्डी संस्थानच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये ११ फेब्रुवारीला शिवाजी राजगुरू ( रा. उई ता.अंबङ जि.जालना) यांची या भामट्याने फसवणूक केली होती. आरोपी सतीश दगडू पाटील याला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील चौकशीत कागदपत्रे जप्त करण्यात आली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येत आहेत.

शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी माध्यमांना सांगितल्याप्रमाणे, ११ फेब्रुवारीला दुपारी शिवाजी राजगुरू त्यांच्या एका नातेवाइकासह शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात आले होते. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आला. आपण शासनाचा माणूस आहोत, असे त्यांनी राजगुरू यांना सांगितले. तुम्हाला सरकारी योजनेतून उपचार मिळवून देतो, तुमची राहण्याची व जेवणाचीही सोय करतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. शिवाजी राजगुरू यांनी सहजपणे त्याच्यावर विश्वास ठेवला.

‘ कागदपत्रे आणि पैसे माझ्याकडे द्या, मी ते भरतो ‘ , असे सांगून राजगुरू यांच्याकडून त्यांच्या रिपोर्टसह कागदपत्रे तसेच पंधराशे रुपये घेतले. पैसे भरणे आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी जातो असे सांगून गेलो तर परत आलाच नाही. बराच वेळाने राजगुरू यांनी रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली. तेव्हा असा कोणताही माणूस तेथे नियुक्त नसल्याचे किंवा त्यांच्याकडे पैसे घेऊन आला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संस्थानच्या संरक्षण अधिकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला आणि या गुन्ह्यातील आरोपी सतीश दगडू पाटील याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने शिर्डीच्या गुन्ह्याची कबुली दिली. याशिवाय त्याच्याकडून काही दवाखान्यांचे कागदपत्र असलेली फाइल, त्यामध्ये रुग्णांच्या उपचाराचे कागदपत्र व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसंबंधीचे छापील अर्ज आढळून आले. त्याने अशाच पद्धतीने औरंगाबाद घाटी रुग्णालयात आणि धुळे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयतही रुग्णांची अशा पद्धतीने फसवणूक केली असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.