बलात्काराच्या आरोपातून २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; २ दशकांत अख्खं कुटुंब संपलं

आग्रा: बलात्कार प्रकरणात गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीची अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. विष्णू तिवारी असं निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

विष्णू २३ वर्षांचा असताना न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो बलात्काराच्या आरोपात दोषी आढळला होता. आता २० वर्षांनंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली. पण या कालावधीत त्यानं त्याचे आई-वडील आणि दोन मोठे भाऊ गमावले.

विष्णू उत्तर प्रदेशच्या ललितपूर गावचा रहिवासी आहे. वर्ष २००० मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णूवर दाखल करण्यात आला. त्यावेळी विष्णू वडील आणि दोन भावांसोबत राहायचा. कुटुंबाला मदत करण्यासाठी तो नोकरी करत होता.

ट्रायल कोर्टानं विष्णूला दोषी ठरवलं. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २००३ मध्ये त्याची रवानगी आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. २००५ मध्ये विष्णूनं उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र त्याला आव्हान देता आलं नाही. सहा वर्षांपूर्वी विष्णूच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्याला अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. दोन भावांच्या अंत्यविधींनादेखील तो गैरहजर होता.