५० कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या सुमारे ५० कोटी वृक्षलागवड मोहिमेची चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प करून तीन वर्षे योजना राबवली होती. आज सभागृहात वृक्ष लागवड योजनेसंदर्भात चर्चा झाली त्यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात वृक्षलागवड योजनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘वृक्ष लागवड योजना फडणवीस सरकारची ड्रीम योजना होती. या योजनेत राज्यातील तिजोरीतून खर्च झाले, खासगी लोकांकडूनही पैसे गोळा करण्यात आहे. एक रोप किती रुपयाला पडलं, तसंच, कोणत्या रोपवाटिकेतून ही रोपं आणण्यात आली याचे सविस्तर उत्तर यात हवंय. हे ड्रीम प्रोजेक्ट यशस्वी झालंय का? की हे प्रोजेक्ट भ्रष्टाचारातच गुंतलं आहे,? याची चौकशी व्हावी,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढील सहा महिन्यात सभागृहाला चौकशी अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहाला दिली.

मंत्र्यांनी समिती करु असं सांगितलं हे चांगलंच आहे. पण मुख्यमंत्र्यांनीच सांगितलंय की २८. २७ कोटी इतकी वृक्ष लागवड झाली. म्हणजेच ७५ टक्के वृक्ष जिवंत आहेत. हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलय आता यावर हे समिती स्थापन करणार. म्हणजे मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीये का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.