कंगनावर टीका भोवली की मोदी विरोध ? बॉलिवूडमध्ये आयकर विभागाचे धाडसत्र

  • by

आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने आता आपला मोर्चा बॉलिवूडमधील मोदींवर टीका करणाऱ्या व्यक्तींवर वळवला असून आज अभिनेत्री तापसी पन्नू दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाडी टाकल्या आहेत . या बड्या कलाकारांनी कर चुकवला असे इन्कम टॅक्स विभागाचे म्हणणे आहे मात्र ज्या निवडक व्यक्तींच्या घरी किंवा ऑफिसवर धाडी टाकण्यात आल्या, ते पाहता ही कारवाई राजकीय हेतूनेच असल्याचा दाट संशय आहे.

कंगनाशी पंगा घेणारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि सातत्याने मोदी यांच्यावर टीका करणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप आधीपासून केंद्राच्या रडारवर राहिलेले आहेत. अनुरागच्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री तापसी पन्नू देखील इन्कमटॅक्सच्या रडारवर आली आहे. कंगना प्रत्येक विषयावर तिचे मत मांडत असते. शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारच्या विरोधात मत मांडत, ‘दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा स्वत:चा विश्वास बळकट करा’, असे ट्विट करुन तापसीने रिहानावर टिका करण्यांना चांगलाच टोला लगावला होता. तापसीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तापसी विरुद्धा कंगना असे ट्विटर वॉर रंगलेले पहायला मिळाले.

तापसीने बॉलिवूडमध्ये पाय ठेवल्यापासून वेगवेगळ्या भूमिका करत बहार उडवून दिली आहे. तिने केलेल्या दमदार हाणामारीच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या आहेत. त्याच बरोबर तिचा ‘पिंक’ हा चित्रपट तर तिच्या आणि अमिताभच्या जुगलबंदीसाठी नक्कीच बघावा असा आहे. अक्षय कुमार सोबत नीरज पांडे यांच्या ‘बेबी’ चित्रपटात तिने अभिनय केला. बॉलिवूड मधील ‘पिंक’, ‘बेबी’, ‘सांड की आंख’, ‘थप्पड’ हे चित्रपट देखील खूप गाजले. तापसीने ‘लूट लपेटा’मधील आपला पहिला लूक शेअर केला आहे. तिच्या या पात्राचे नाव ‘सावी’ आहे. यापूर्वी अनुराग कश्यप समवेत अभिनेत्री तापसी पन्नूने ‘मनमर्जिया’ नावाचा चित्रपट केला आहे. ती या काळात टाईम ट्रॅव्हलवर आधारित दुसर्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे

तापसी व कंगना राणावत यांच्यात कायमच ट्विटरवॉर सुरु असते. कंगनानं तापसीला ‘बी ग्रेड म्हटले होते त्यानंतर तापसीने कंगनावर निशाणा साधत कंगनाच्या डीएनमध्येच विष आहे, असे तापसीने म्हटल होते. तिच्या ट्विटचे उत्तर देताना तापसीने असे म्हणले आहे की,’सोशल मीडियावर आपले विचार मांडायचा जर कोणाला अधिकार असेल, तर ती फक्त कंगना रनौत आहे. तिच्या डीएनएमध्येच विष आणि शिव्या भरल्या आहेत’,असे सडेतोड उत्तर तापसीने कंगनाला दिले होते.

राहिला विषय आता अनुराग कश्यप ह्याचा तर अनुराग खूप आधीपासूनच मोदींचा कट्टर विरोधक राहिलेला आहे . काही महिन्यांपूर्वी अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींवर टीका करत, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही बोचरी टीका केली होती. इतकेच नव्हे तर अनुराग नेहमीच त्याच्या अशाच तिखट वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. कंगनालाही त्याने असेच खडे बोल सुनावले होते.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात 2019 मध्ये देशभरात आंदोलनाचे सत्र सुरु होते. कुठे दगडफेक, तर कुठे जाळपोळ होत होती. तर, त्याविरोधात अनेक ठिकाणी शांततेतही मोर्चे निघाले होते. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील चर्चित सिनेनिर्माता अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता. अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींनी मुका आणि बहिरा, असे संबोधले होते. अनुराग कश्यपने ट्विट करुन मोदींवर तिखट टीका केली होती.

‘आमचा प्रधानसेवक, आमचा पंतप्रधान, जनतेचा प्रधान नोकर नरेंद्र मोदी बहिरे, मुके आणि भावनाशून्य आहेत. ते केवळ एक नाटकी आहेत, जे भाषण देऊ शकतात. अन्य काही त्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. त्यांना ना दिसतंय, ना ऐकू येतंय. ते आता नव नवा खोटापणा शिकण्यात व्यस्त आहेत, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं होतं. सरकार समर्थक दंगे सुरु करतात आणि त्यानंतर जनतेवर पोलीस तुटून पडतात. देशातील सद्यस्थितीला भाजप सरकार जबाबदार असून, चिघळलेल्या परिस्थितीमागे भाजपचाच हात आहे, असाही आरोप अनुराग कश्यपने केला होता.

एकेकाळी जवळची मैत्रीण असणाऱ्या कंगना रनौतवर देखील अनुरागने सडकून टीका केली होती. ‘कंगना दिग्दर्शकांना शिविगाळ करते. एडिटरजवळ बसून आपल्या सहकलाकारांच्या चित्रपटातील भूमिका कापते. तिच्या या वागणुकीमुळे एकेकाळी तिचं कौतुक करणारे दिग्दर्शकही आज तिच्यापासून लांब पळतात. दुसऱ्यांना दडपून टाकण्याची किंवा दबाव टाकण्याची ताकद आपण कमावली, असं कंगनाला वाटत असेल. याशिवाय कंगनाचे जवळचे तिच्या वागणुकीचा आरसा तिला न दाखवून आणि डोक्यावर चढवून तिचंच नुकसान करत आहेत’, असं अनुराग कश्यप म्हणाला होता त्यामुळे भाजपच्या जवळची असलेली कंगना आणि मोदी यांना केलेला विरोध म्हणून शासकीय यंत्रणा त्यांच्यापाठी लागली की काय ? अशी देखील चर्चा आता होऊ लागलेली आहे .