उद्धव ठाकरेंना समजले शेतकऱ्याचे दुःख, ‘ शेतकऱ्यांना कामाचे तास रात्रीचे कशासाठी ? ‘

शेअर करा

शेतकरी बांधवांना शेतीसाठी दिवसा आणि पुरेशी वीज देण्यालाच शासनाची प्राथमिकता आहे. त्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. उद्धव ठाकरे महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचं उद्घाटन करताना विधानभवनात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते

उद्धव ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांचे कौतुक केले आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर देखील भाष्य केले. ते म्हणाले, “सर्व देश, राज्य टाळेबंदीत होते तरी शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे घरुनच केली जात होती. शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कटुंबियांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील.

पुढे ते म्हणाले, “जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात, मग शेतकऱ्यांचे मात्र रात्रीचे कशासाठी? ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संकटांचा मुकाबला करत तो जगासाठी सोनं पिकवत असतो. त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे क्षण कसे येतील हे पाहणे सरकारचे काम आहे. ‘घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ’ असे आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाची ताकद मोठी असते. ती जेवढी जास्त मिळेल तेवढा काम करण्याचा हुरुप वाढतो. त्या जोरावर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे जे करणे शक्य आहे ते निश्चितच करूच ”

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला आमचं प्राधान्य असून नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असून उद्धव ठाकरे यांच्या भाषणात निव्वळ घोषणांचा पोकळ मारा दिसला नाही तर शेतकऱ्यांच्या अडचणी देखील त्यांनी व्यवस्थित मांडल्या आणि त्या कशा दूर करता येतील यावर देखील भाष्य केले .


शेअर करा