‘ त्या ‘ निनावी पत्राने फोडली वाचा, बायकोनेच केला होता प्लॅन

  • by

बेंगळुरूतील राजगोपालनगर पोलिसांनी येथील उद्योजकाच्या हत्येचा अवघ्या दोन दिवसांत छडा लावला. एका निनावी पत्रामुळे या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचा सांगून महिलेकडून आणि तिच्या घरच्यांकडून दिशाभूल करण्यात आली होती मात्र हा खुनच असल्याचे अखेर निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हेग्गनहल्ली येथील रहिवासी मोहम्मद हंजाला (वय ५२) यांचे पिन्या एमआयडीसीत चपलांचा कारखाना आहे. त्यांची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांची पत्नी शर्वरी बेगम (वय ४२) आणि मुलगा शफी-उर-रेहमान (वय २०) या दोघांनी ही सुपारी दिली होती.

आफताब (वय २१, थानिसंद्रा), मोहम्मद सैफ (वय २०, हेग्गनहल्ली) आणि सईद अवेझ पाशा (वय २३, पिन्या) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाइल फोन आणि ९८ हजार रुपये जप्त केले आहेत. बेगम आणि रेहमानने पोलिसांकडे या हत्येची कबुली दिली आहे. कौटुंबिक वाद व्हायचे. तसेच पती कायम तिच्यावर संशय घेत होते त्यामुळे अखेर पत्नी बेगम आणि रेहमान यांनी हंजाला यांच्या हत्येची सुपारी दिली.

हंजाला यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे त्यांचे मित्र, नातेवाइक आणि शेजाऱ्यांना सांगण्यात आले. सगळ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. शनिवारी पोलिसांना एक निनावी पत्र आले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशी केली असता, रेहमान आणि बेगम यांनी तिघांना हत्येची सुपारी दिली होती. त्यासाठी साडेचार लाख रुपये दिले होते. आदल्या रात्री हंजाला यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्यांना झोपेच्या गोळ्याही दिल्या. त्यानंतर मध्यरात्री उशीने तोंड दाबून हत्या केली.