व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल अडचणीत

शेअर करा

पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे एका व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश बहल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावरुन टीका करणाऱ्या एका तरुणाला ‘तुझा कार्यक्रम करेन’ अशी धमकी दिल्याचा आरोप योगेश बहल यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात सध्या हा चर्चेचा विषय ठरला असून नगरसेवक योगेश बहल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, योगेश बहल यांनी धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर दोन-तीन दिवसांतच या तरुणाच्या बाईकचा अपघात झाला. सदर अपघात हा बहल यांनीच घडवून आणल्याचा आरोप श्याम घोडके या तरुणानं केला आहे. श्याम घोडके या तरुणाचा एक टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. घोडके याच्या आरोपानुसार योगेश बहल यांनी त्याला फोनवरुन धमकी दिली. त्यात ‘ मर्यादेत राहिला तर बरं होईल, नाहीतर बायांच्या नादाला लागून तुझा कार्यक्रम होईल, मीच तो करेन ’, असे योगेश बहल यांनी धमकावल्याचे घोडके यांनी म्हणले आहे.

श्याम घोडके यांनी या प्रकरणाची तक्रार थेट पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली आहे. तसंच यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलीय. आपल्या जिवाला धोका असून, आपलं काही बरंवाईट झाल्यास त्याला बहल जबाबदार असतील, असंही त्याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. घोडके यांनी फेसबुकवर काही कमेंट्स टाकल्या होत्या त्यावरुन हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

नगरसेवक योगेश बहल यांनी श्याम घोडकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित क्लिप एडिट करण्यात आलेली असून संबंधित तरुणाविरोधात 19 ऑक्टोबर 2020 मध्ये पिंपरी पोलिसांत तक्रार अर्ज केला होता. त्यासंदर्भात मी त्याला तुझी सायबर सेलमध्ये तक्रार करेल असं सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असं योगेश बहल यांनी म्हटलंय.


शेअर करा