‘ एक और नरेन ’, मोदींवर आणखी एक सिनेमा पाहायला कोण कोण जाणार ?

  • by

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला आणखी एक सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ एक और नरेन’ असे या सिनेमाचे नाव असून यात ‘महाभारत’ या मालिकेत युधिष्ठीरची भूमिका साकारणारे अभिनेता गजेंद्र चौहान मोदींची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहेत. लोकप्रिय अशा महाभारतामधील गजेंद्र चौहान यांना मोदींच्या भूमिकेत पाहण्याचा लाभ आता चित्रपट रसिकांना आणि विशेषतः मोदींच्या समर्थकांना घेता येणार आहे.

गजेंद्र चौहान यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी चित्रपटाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी खूप दिवसांपासून या भूमिकेची तयारी करत होतो, असे त्यांनी म्हटले आहे. गजेंद्र चौहान यांना बहुव्यक्तित्वाची प्रतिभा असलेल्या मोदींच्या भूमिकेत पाहणे, हे निश्चितच आव्हानात्मक राहणार आहे. भाजप सत्तेत आल्या आल्या गजेंद्र चौहान यांची फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली होती, त्यावेळी चांगलाच वाद निर्माण झाला होता. सध्या गजेंद्र चौहान हे भाजपचे समर्थक असून हबीबा रहमान असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मिलन भौमिक हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा सिनेमा दोन भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका भागात स्वामी विवेकानंद यांचे कार्य दाखवले जाणार तर दुस-या भागात मोदी कशाप्रकारे विवेकानंदांच्या विचारांचे अनुकरण करतात याबाबत सांगितले जाणार आहे. मिलन भौमिक गेले वर्षभर मोदींच्या वैयक्तिक आयुष्यावर संशोधन करत होते. तूर्तास या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे आणि येत्या 12 मार्चपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर याआधी ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा आला होता. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यात अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट चांगला चालला नाही मात्र चित्रपटाचे प्रोड्युसर असलेल्या संदीप सिंह यांचे नाव सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातही आले होते.