गूढ वाढले ? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या कारच्या मालकाचा आढळला मृतदेह

  • by

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच, त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलेले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू होता. ही कार कुणाची आहे याची माहिती उघड झाली होती. मनसुख हिरेन हे या कारचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते.

मनसुख हिरेन यांनी कार चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. मात्र, आता मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसुख हे काल रात्रीपासून बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारही दिली होती. त्याचा तपास सुरू असतानाच आज अचानकपणे त्यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला.

मनसुख हिरेन असं गाडी मालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे.

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना मनसुख हिरेन यांनी कार चोरीला गेल्याची माहिती सांगितली होती. गाडीचे स्टिअरिंग जाम झाल्यामुळे गाडी पार्क करून ते गेले होते मात्र दुसऱ्या दिवशी गाडी मिळून आली नाही म्हणून स्वतःच तक्रार केली अशी माहिती त्यांनी दिली होती तसेच इनोव्हा गाडीविषयी आपल्याला काही माहिती नाही असे देखील ते म्हणाले होते. मनसुख हिरेन यांचा ऑटोमोबाईल ऍक्सेसरीजचा कारभार आहे.