पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, ‘ ह्या ‘ तारखेला होऊ शकतो मोठा निर्णय

  • by

पुणे जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची आणि करोनामृत्यूंची संख्या वाढली असल्याने कोणत्या प्रकारचे निर्बंध लावायचे, याबाबतचा अंतिम निर्णय येत्या शुक्रवारी (दि. १२) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालये ही १४ मार्चनंतरही बंद ठेवण्याचे संकेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत

करोना संसर्गाच्या सद्यस्थितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत येथील विधान भवन येथे घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांनी केलेला पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता, त्यात ‘ शाळा आणि महाविद्यालये ही १४ मार्चनंतरही बंद ठेवण्याची शिफारस केली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना फार त्रास होणार नाही. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नियोजन केले जाणार आहे ’ असे राव यांनी स्पष्ट केले.

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती राव यांनी दिली. राव म्हणाले, ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूंची नोंद गुरुवारी झाली. त्यामुळे आगामी काळात निर्बंध लावावे लागणार आहेत. येत्या शुक्रवारी (दि.१२) पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे’

राज्यात नवीन बाधितांचा आकडा वाढत चालल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही पुन्हा एक लाखाच्या दिशेने सरकली आहे. सध्या ८८ हजार ८३८ रुग्ण राज्यात उपचार घेत आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल पुणे मंडळात एकूण २ हजार ७० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यात सर्वाधिक ८४९ रुग्ण पुणे पालिका हद्दीत आढळले आहेत. पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत ५४९, उर्वरित पुणे जिल्ह्यात ३६९, सातारा जिल्ह्यात २१४, सोलापूर पालिका हद्दीत ४२ तर उर्वरित सोलापूर जिल्ह्यात ४७ नवीन रुग्ण आढळले आहेत.