छिंदम अपात्र झाल्यावर त्या जागेसाठी नगरमध्ये ‘ अशीही ‘ फिल्डिंग, काय आहे बातमी ?

शेअर करा

भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना पाठिंबा देण्याची मागणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी केली असून त्यांच्या या मागणीने नगरमधील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहे.

नगरमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक मानले गेलेले भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत अनिल राठोड यांच्या मुलांनीही पुढे हे राजकीय वैर पाळले. आता मात्र गांधी यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार न देता राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे. ज्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे ती जागा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविल्यामुळे रिक्त झालेली आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये अपक्ष म्हणून आलेल्या छिंदमला अपात्र ठरवून ते पद रद्द केले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यासोबत बोलताना छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावेळी तो भाजपमध्ये होता. नंतर भाजपने त्याला बडतर्फ केले अशी घोषणाही केली होती. शिवसेनेने याच विषयावरून भाजपला टार्गेट केले होते आणि छिंदम याच्या विरोधात मोठी आघाडी उघडली होती . त्यानंतर छिंदम पुन्हा याच प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आला होता. दरम्यानच्या काळात शिवसेना नेते राठोड यांचे निधन झाले.

सुरेंद्र गांधी यांनी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्याकडे केलेल्या मागणीत काय म्हटले आहे ?

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील ही पोटनिवडणूक भाजपने न लढविण्याचा निर्णय घ्यावा. तेथून दिवंगत राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांना पाठिंबा द्यावा. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत शहरात काम केले होते. त्यांचा राजकीय प्रवास खूप खडतर होता. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी माझी ही वैयक्तिक मागणी आहे. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व राठोड यांना कोणताही राजकीय वारसा नसतांना स्वतःच्या कर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केले. दोघांचा राजकीय प्रवास बरोबर सुरु झाला.

दिलीप गांधी व अनिल राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून ताणतणाव व राजकीय वाद होता. तरीही सुमारे २५ – ३० वर्षे दोघांनी भाजपा-सेना युतीत बरोबर काम केले होते. दोघांनीही एकमेकांच्या निवडणुकीत सहकार्य केलेले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्व. राठोड हे जवळचे स्नेही होते. प्रभाग ९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार न देता विक्रम राठोड यांना पाठींबा द्यावा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कडेही मी करणार आहे

सुरेंद्र गांधी याच्या या मागणीवर भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शिवाय स्वत: राठोड यासाठी तयार आहेत का? छिंदम याची भूमिका काय असेल ?. नागरिकांचाही कौल कुणाला राहील तसेच महापालिकेत भाजपला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही यासाठी लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गांधी यांच्या पत्रामागील नेमका हेतू काय असावा, याबद्दल नगरमध्ये चर्चाना उधाण आलेले आहे.


शेअर करा