मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : ‘ निष्पक्ष चौकशी होईल ना ? ‘ चित्रा वाघ कडाडल्या

शेअर करा

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणी विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत. स्फोटकांनी भरलेली गाडी उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर कुणी उभी केली, मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ‘ निष्पक्ष चौकशी होईल ना ? ‘ असा प्रश्न विचारला आहे. तसेच चित्रा वाघ यांच्या जीविताला धोका असल्याचे सुधीर मुनगुंटीवार म्हणाले होते, तो व्हिडिओ रिट्विट केलेला आहे.

चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘ महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना ?.’

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलिस करत असलेल्या तपासावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकार बदलत असते पण मुंबई पोलिस तेच असतात. त्यांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे, राजकारण करण्यासाठी विरोधकांनी विरोध केला असला तरी पोलिसांवर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास आता एटीएसकडे दिला आहे. त्यामुळे तो योग्य पद्धतीनेच होणार, याच शंका घेण्याचे कारण नाही. पोलिसांवर आरोप करणे चुकीचे आहे, असे देखील म्हटले आहे.

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर भाजपच्या पाठोपाठ आता मनसेने देखील टीका केली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत? असा सवाल मनसेने केला आहे. त्यामुळे आधीच भाजपच्या रडारवर असलेले वाझे आता मनसेच्याही निशाण्यावर आल्याचं बोललं जात आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून हा आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वाझेंवर काही आरोप केले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं घर ठाण्यात आहे. जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातच सापडली. इतकंच नाही, जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमलं आहे. हे आश्चर्यकारक आहे, असं फडणवीस म्हणाले होते.

हिरेन बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि इतर कुणीही क्रॉफर्ड मार्केटला पोहोचले नाहीत. अंबानी याच्या घरापुढील गाडीजवळ सचिन वाझे सगळ्यात आधी तिथे पोहोचले. त्यांनाच तिथे त्यांना चिठ्ठी सापडली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच, त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलेले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत असतानाच देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत .

मनसुख हिरेन यांच्या तोंडावर रुमाल बांधलेले होते तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनसुख हिरेन यांचे हाथ बांधलेले होते, असे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे . मनसुख हिरेन यांची डेड बॉडी स्वतः पाहिल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. प्रकरणाचा तपास हा आता एटीएस कडे सोपवण्यात आलेला आहे. आशिष शेलार यांनी सचिन वझे हे पोस्टमार्टेम सुरु असताना तिथे का उपस्थित होते ? यावर देखील आक्षेप घेतला आहे. ‘ आपले वडील कधीच आत्महत्या करणार नाहीत ‘ असा दावा देखील हिरेन यांच्या मुलाने एका निकटवर्तीयांशी बोलताना केलेला आहे . सदर प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे .

मनसुख हिरेन असं गाडी मालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संशयाच्या भोवऱ्यात उभे केलेले सचिन वाझे नक्की कोण आहेत ते जाणून घेऊया

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता.

वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. काही चॅनेल्सवर ते शिवसेनेची भूमिका मांडताना देखील दिसले होते.

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.


शेअर करा