घ्या अच्छे दिन..चिमुरडीच्या जखमांना टाके घालण्यास नकार , रुग्णालयाबाहेर सोडला प्राण

  • by

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका खासगी रुग्णालयात घडलेला एक अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आला आहे. मुलीच्या उपचारासाठी पुरेशी रक्कम कुटुंबीय भरू शकले नाहीत म्हणून अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीला उपचारांशिवाय जखमांना टाके घालण्यास रुग्णालयाकडून नकार देण्यात आला आणि रुग्णालयातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप दुर्दैवी कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयाकडून मुलीवर उपचारासाठी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. हे पैसे भरण्यास कुटुंब असमर्थ असल्याचं लक्षात आल्यानंतर रुग्णालयानं मुलीच्या जखमांना टाकेही न घालता तिला रुग्णालयातून बाहेर काढलं. मुलीच्या पोटावर टाके घालण्यासही रुग्णालयाकडून नकार देण्यात आला. त्यामुळे मुलीची तब्येत खालावली आणि अखेर तिने अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं या प्रकरणाची दखल घेत रुग्णालयाविरुद्ध चौकशी सुरू केलीय. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मुलगी अत्यवस्थ अवस्थेत दिसतेय तर तिचे आई – वडील आपली कहाणी सांगताना दिसत आहे. आर्थिकरित्या दुर्बल असलेलं हे कुटुंब कौशांबी जिल्ह्यातील रहिवासी आहे.

वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल कमीशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईटसनं या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. या प्रकरणात ‘युनायटेड मेडिसिटी रुग्णालया’चा बेजबाबदारपणा सिद्ध झाला तर संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी, असंही त्यांनी म्हटलंय.