‘ मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनी केली ‘ देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

शेअर करा

मुंबईला हादरावून सोडणाऱ्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळजनक दावा केला असून मनसुख हिरेन प्रकरण सध्या त्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अधिवेशनात एकच खळबळ उडाली.

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करताना मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांचा पोलीस जबाबच सभागृहात वाचून दाखवला.त्यात फडणवीस यांनी अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे. मनसुख हिरेन प्रकरण हे केवळ अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके पर्यंत मर्यादित नसून त्याला अनेक अँगल असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे .

फडणवीस यांनी वाचलेला मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब काय ?

‘ सचिन वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते. नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरली होती. 4 महिने कार वाझे यांच्याकडे होती. २६-२-२०२१ रोजी वाझे सोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि वाझे यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करुन घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असं सांगितले ‘

‘मनसुख हिरेन यांनी भावाला वकीलांशी बोलून घ्यायला सांगितले होतं. हा खून वाझे यांनी केला असावा माझा संशय आहे. 2017 मध्ये एफआयआर दाखल असून 40 लाखांनी खंडणी मागितली आणि या प्रकऱणात धनंजय गावडे, सचिन वाझे यांची नावे समोर आली. मनसुख यांचं शेवटचं लोकेशन गावडेकडे होतं आणि त्यानंतर 40 किमी दूर मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला. पण ओहाटी असल्यामुळे मनसुख यांचा मृतदेह बाहेर आला. सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना 202 गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी. “

सचिन वाझे यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोध आमनेसामने आले. फडणवीसांच्या मागणीवर शिवसेनेचे सदस्य भास्कर जाधव यांनी जोरदार शब्दांत पलटवार केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण आणखीच तापल्याचे पहायला मिळाले..

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत सापडला. याप्रकरणी सध्या तपास सुरू असून मनसुख यांच्या पत्नी विमला यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्या जबाबाचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना लक्ष्य केले होते.

मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात कारवाई करण्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आहेत. त्यांना निलंबित करून अटक करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यावर भास्कर जाधव यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला व अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करत फडणवीस यांना त्यांच्या काळात दाबलेल्या एका प्रकरणाची आठवण करून दिली.

भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना , ‘ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७ मध्ये अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबण्यात आलं. अन्वय नाईक यांच्या पत्नीच्या विनंतीवरून आता आमचं सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वाझे यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे. त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या अर्णब गोस्वामी यांना घरातून उचलून आणले. त्यामुळे वाझे पदावर राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह आणखीही अनेक जण गोत्यात येतील, असे त्यांना वाटत आहे व त्यामुळेच भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य करण्यात येत आहे’, असाही टोला हाणला.

भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी केलेले आरोप फडणवीसांनी फेटाळले व अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. हे कदाचित भास्कर जाधवांना माहीत नसेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला. त्याचवेळी तुम्ही मला धमक्या देऊ नका. मी अशा धमक्यांना घाबरत नाही, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.


शेअर करा