‘ म्हणून सचिन वाझेंना लटकवताय का ? ‘ उद्धव ठाकरेंचा भाजपच्या दुखऱ्या नसेवर प्रहार

शेअर करा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नाव समोर आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी आज अधिवेशन चांगलेच गाजवले. सत्ताधाऱ्यांनीही अन्वय नाईक प्रकरणावर फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. आता अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामी प्रकरणावरुन फडणवीसांना टोला लगावला आहे. एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून सचिन वाझेंना लटकवताय का ? असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

सचिन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. २००८ ला होते. त्यानंतर त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. हिरेन प्रकरण लावून धरलं, ते धरायलाच हवं. मात्र डेलकर प्रकरणात तर भाजपचा मंत्री आहे. सचिन वाझे तर मंत्री नाही. पक्षपातीपणे का बघताय ? सचिन वाझेला का लटकवताय ? एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून ?.

मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरण ते मनसुख हिरेन प्रकरणामुळे गाजलेल्या या अधिवेशनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अधिवेशन घेणं कोरोनात आव्हानात्मक होतं. पण नियम पाळून अधिवेशन घेतलं. विरोधकांनीही उत्तम सहकार्य केलं. परवा अर्थसंकल्प सादर केला. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणं न गाता ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’, हे आपलं ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.


शेअर करा