‘ उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी ‘,किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

शेअर करा

अन्वय नाईक कुटुंबीयांना पुढे करुन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पैशांची अफरातफर करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील, असे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. मी नाईक कुटुंबीय आणि ठाकरे यांचा जमीन घोटाळा बाहेर काढला तेव्हा शिवसेनेचे 12 नेते माझ्याविरोधात एकटवले होते. मात्र आता हे सगळे कुठे गेले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारात इतका रस का घेत आहेत, अशा शब्दात अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने आधीच सौमय्यांना फटकारले आहे.

किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकेची तोफ डागली त्यावेळी बोलताना , ” रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. नाईक कुटुंबीय जमिनीची खरेदी-विक्री हा आमचा व्यवसाय असल्याचा दावा करत आहेत. ही गोष्ट चांगली आहे. पण ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे, याविषयी कोणीही बोलत नाही. नाईक परिवाराला पुढे करून ते पैशांची अफरातफर करत असतील तर मला बोलावेच लागेल. ज्याने कोणी चोरीचा पैसा घेतला आहे तो परत द्यावाच लागेल. उद्धव ठाकरे यांची गाठ किरीट सोमय्याशी आहे. त्यांना सगळे हिशेब द्यावेच लागतील ” असे म्हटले आहे.

अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने काय म्हटले होते ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारावरुन भाजपकडून होणाऱ्या आरोपांसंदर्भात नाईक कुटुंबीयांकडून पहिल्यांदाच थेट उत्तर देण्यात आले होते. मुळात हा व्यवहार आठ ते दहा वर्षांपूर्वीचा आहे आणि जमीन खरेदी किंवा विक्री करणे हा गुन्हा आहे का ? या व्यवहाराचा आणि अन्वय नाईक मृत्यूप्रकरणाचा संबंध आत्ताच का जोडला जात आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला.

माझे वडील हे वास्तूविशारद (आर्किटेक्ट) होते. त्यांनी कित्येक नेत्यांना जमिनी विकल्या असतील. अगदी शेवटपर्यंत ते प्लॉटिंग करुन जमिनी विकायचे काम करत होते. यामध्ये गैर ते काय आहे? भाजप नेत्यांकडून आरोप होत असलेल्या जमिनीच्या सर्व सातबाऱ्यांची माहिती द्यायला आम्ही तयार आहोत. अगदी आमच्या बँकेचे तपशीलही आम्ही सादर करु, असे देखील आज्ञा नाईक यांनी सांगितले होते.

याप्रकरणात आमची दोन माणसं गेली आहेत, म्हणून आमचा जीव वर-खाली होतो. तर अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे ते आमच्यावर आरोप करतात. मात्र, याप्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जीव इतका वर-खाली का होत आहे, याचे कारण आम्हाला अद्याप समजलेले नाही, असे आज्ञा नाईक यांनी म्हटले.


शेअर करा