सर्वात मोठी बातमी .. बाळ बोठे यास अटक, अशी झाली कारवाई ?

शेअर करा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता.

हैद्राबाद भागात बोठे असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन करून त्या भागात पाठविली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी बोठे याच्यासह तिघांना तेथून ताब्यात घेतले. मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यामध्ये एक महिलाही आहे.

बोठे याला घर भाड्याने मिळवून देणे, मोबाईल फोन उपलब्ध करून देणे, पैसे पुरविणे अशा प्रकारची मदत या संशयित आरोपींनी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बोठे याच्यासोबत त्यांनाही अटक होत आहे. आरोपीला घेऊन पोलिस नगरकडे निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्या भागात ही कारवाई सुरू होती. अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांनी ही कामगिरी केली. याबद्दल अधिकृत आणि सविस्तर माहिती स्वत: पोलिस अधीक्षक पाटील देणार असल्याचे सांगण्यात आले.

आरोपी सागर भिंगारदिवे याच्यामार्फत बाळ बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मधल्या काळात त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयातही तो फेटाळण्यात आला. मधल्या काळात पोलिसांनी त्याला फरार घोषित केले. पारनेर येथील न्यायालयाने त्याला फरार घोषित करून ९ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पोलिस बोठे याची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करणार होते. त्याधीच त्याला अटक झाली.

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले होते. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले होते. त्याविरोधात बोठेने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे बाळ बोठेविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता.

नगर येथील रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला होता . त्याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती मात्र त्याच्या आतच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रेखा जरे यांच्या खुनाला तीन महिने होऊन गेले. तरीही बोठेचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता.

दरम्यान रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे ? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही ? सरकार त्याला पाठीशी घालतेय काय ? असे प्रश्न उपस्थित करीत जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पाच मार्चपासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याप्रकरणी एक निवेदन दिलेले होते. रेखा जरे यांचे प्रकरण दडपण्यासाठी मोठे कारस्थान सुरू असल्याचा संशयही जरे यांनी व्यक्त केला होता.

पोलिसांची पाच पथके बाळ बोठे याचा शोध घेत होती. पोलिसांनी रेखा जरे यांच्या घराची,तसेच या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बोठे याच्या घराची झाडाझडती घेतली होती आणि काही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली होती . नगरसह अन्य ठिकाणी आतापर्यंत दहापेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांना शोध घेतला होता . विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते .

टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बाळ बोठे याने काही दिवसापूर्वी नगर इथे हनी ट्रॅपचे रॅकेट कसे कार्यरत आहे याबदल एक मालिका छापली होती. त्या मालिकेत कसे धनदांडगे सावज हेरून जाळ्यात ओढले जाते आणि नंतर माहितीतील पोलिसांची मदत घेत धाड घालून कशा पद्धतीने ‘ मांडवली ‘ केली जाते याचा लेखाजोखा देखील दिला होता, अर्थात ही माहिती बोठे यांच्यापर्यंत कशी पोहचत होती हे मात्र गूढ आहे.

नगर शहरात असलेल्या या कथित हनी ट्रॅपमध्ये कोण कोण सहभागी आहेत याचाच पोलीस सध्या शोध घेत आहेत तसेच रेखा जरे यांच्या खुनाशी देखील हनी ट्रॅप निगडित आहे का ? अशा अँगलचा देखील शोध सुरु आहे . नाजूक विषय असल्याने कोणी पुढे येऊन पोलिसांना मदत करण्यास धजावत नाही तसेच ‘ झाकली मूठ सव्वा लाखाची ‘ अशा रीतीने मोठी धेंडे देखील बदनामीपोटी गप्प आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती.

रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला आणि अद्यापदेखील पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता.


शेअर करा