‘ आता गुडबाय म्हणायची वेळ ‘, सचिन वाझेंच्या व्हॉटसअप स्टेटसने गूढ वाढले

शेअर करा

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनतर वाझेंची नागरिक सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत धक्कादायक खुलासे केले आहेत. या व्हॉटसअप स्टेटसमध्ये सचिन वाझे यांनी आतापर्यंत काय काय त्रास झाला याचा लेखाजोखाच मांडला आहे.

मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे हे मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या मृत्यू प्रकरणामागे वाझे असल्याचा दावा फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाचा आधार घेत केला आहे. फडणवीस यांच्या आक्रमणतेनंतर सरकारने या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडून एटीएसकडे सोपवला आणि पाठोपाठ सचिन वाझे यांची बदलीही करण्यात आली. दरम्यान वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत सीआयडीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे सचिन वाझे यांचे व्हाट्सएप्प स्टेटस ?

‘ ३ मार्च २००४ पासून काही सीआयडी अधिकाऱ्यांनी एका खोट्या प्रकरणात मला अटक केली. त्या प्रकरणात आत्तापर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही.पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. माझे सहकारी मला पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करतायत, असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. १७ वर्ष माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती. पण आता माझ्याकडे आयुष्याची ती १७ वर्षही नाहीत, ना नोकरी करण्याचा संयम. आता या जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत चालली आहे, असं मला वाटतय,’ असंही सचिन वाझेंनी म्हटलं आहे. सचिन वाझेंच्या या व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर चर्चेला उधाण आलं आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे तर भाजपकडून त्याच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे. वाझे यांच्यावर पुढे अद्याप मोठी अशी कोणतीही कारवाई झालेली नसली तरी या प्रकरणात अटकेची भीती त्यांना सतावू लागली आहे. त्यातूनच त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून या अर्जावर १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

काय आहे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ?

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन नुकतेच संपले आहे . कोरोनामुळे या अधिवेशनाचा कालावधी अवघ्या दहा दिवसाचा ठेवण्यात आला. पण हे दहा दिवस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच गाजवल्याचे पहायला मिळाले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणापर्यंत फडणवीस यांनी हातात पुरावे घेऊन जोरदार बॅटिंग करत सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण विधानसभेत मांडल्यानंतर सर्वात आधी त्यांनी हिरेन यांचा जबाब वाचून दाखवून गृहमंत्री अनिल देशमुख यांना चांगलेच अडचणीत आणले . सापडलेली गाडी हिरेन यांच्या मालकीची नव्हती. त्यांच्या मित्राची गाडी होती. वाझे यांचे हात बांधलेले नव्हते. ठाण्यात पोस्टमार्टम होत आहे. त्यातून सर्व माहिती पुढे येईल तसेच या प्रकरणाचा तपास वाझे करत नसून नितीन अलकनुरे करत आहेत,असे प्रतिउत्तर देखील अनिल देशमुख यांनी फडणवीस यांना दिले.

देवेंद्र फडणवीसांनी उभं राहून गृहमंत्र्यांच्या या निवेदनाला आक्षेप घेतला आणि त्यांनी थेट हिरेन यांनी पोलिसांना दिलेला कबुली जवाबच वाचून दाखवला. हिरेन यांनी ही गाडी विकत घेतली असल्याचं कबुली जबाबात म्हटलं आहे. पोलीस तुम्हाला माहिती देत नाही का ? पोलीस तुम्हाला चुकीचं ब्रिफिंग करत आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच अलकनुरे यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी तपास दिला आहे. सात दिवस तर वाझेच तपास करत होते, असंही फडणवीस यांनी सांगितल्याने अनिल देशमुख यांची पंचाईत झाली.

फडणवीस यांनी विधानसभेत विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवून एकच धमाका उडवून दिला. सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचं विमला हिरेन यांनी म्हटलं आहे. त्यांनी वाझे आणि हिरेन यांचे संबंध होते आणि हिरेन यांच्या हत्येपर्यंतचा घटनाक्रम सांगितेलला आहे. त्यामुळे सर्व पुरावे असताना वाझे यांना अटक का होत नाही, असा युक्तीवाद फडणवीस यांनी केला. त्यामुळे सरकारची एकच भंबरी उडाली. त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची वेळ आली.

फडणवीस यांनी वाचलेला मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब काय ?

‘ सचिन वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते. नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरली होती. 4 महिने कार वाझे यांच्याकडे होती. २६-२-२०२१ रोजी वाझे सोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि वाझे यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करुन घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असं सांगितले ‘

‘मनसुख हिरेन यांनी भावाला वकीलांशी बोलून घ्यायला सांगितले होतं. हा खून वाझे यांनी केला असावा माझा संशय आहे. 2017 मध्ये एफआयआर दाखल असून 40 लाखांनी खंडणी मागितली आणि या प्रकऱणात धनंजय गावडे, सचिन वाझे यांची नावे समोर आली. मनसुख यांचं शेवटचं लोकेशन गावडेकडे होतं आणि त्यानंतर 40 किमी दूर मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला. पण ओहाटी असल्यामुळे मनसुख यांचा मृतदेह बाहेर आला. सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना 202 गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी. “

आमच्या घरात असे काही घडू शकेल यांचा स्वप्नातही विचार केला नव्हता. गाडी प्रकरणात चौकशी सुरु होती. नेहमीप्रमाणे पोलिसांचे फोन येत असत आणि ते चौकशीला जात असत . तिथे त्यांना दिवस दिवस बसवून ठेवले जात होते. पोलिसांना त्यांनी पूर्णपणे सहकार्य केले . त्यानंतर काल कांदिवली येथून तावडे नावाच्या क्राईम ब्रँचमधील व्यक्तीचा फोन आला . त्यानंतर ते नेहमीप्रमाणे गेले आणि गेल्यानंतर अर्ध्या तासानेच त्यांचा फोन बंद झाला. आम्ही रात्रभर त्यांच्या परत येण्याची वाट पहिली आणि आज आम्हाला ही बातमी समजली, की त्यांनी आत्महत्या केली . माझे पती काही आत्महत्या करण्याविषयी विचारही करू शकत नाही, ही चुकीची अफवा पसरवली गेली आहे . याच्या मुळापर्यंत जाऊन सत्य बाहेर यावे अशी माझी इच्छा आहे . “

काय आहे प्रकरण ?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू होता. ही कार कुणाची आहे याची माहिती उघड झाली होती. मनसुख हिरेन हे या कारचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते.

मनसुख हिरेन असं गाडी मालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला . त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे.


शेअर करा