राजकारणात मोठी उलथापालथ..महाविकास आघाडीकडून ‘ हा ‘ मोठा निर्णय होण्याची शक्यता

शेअर करा

सचिन वाझे अटक प्रकरणामुळे टीकेला सामोरं जावं लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चर्चा असून गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांना हटवण्यात येण्याची चर्चा सुरु असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीत सचिन वाझे यांच्या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदल संदर्भातही महत्वाची चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकार मात्र स्थिरच राहणार असून सरकार पडावे म्हणून पाण्यात देव घालून बसलेल्या भाजपच्या वाट्याला मात्र निराशाच येणार आहे.

शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. गेले वर्षभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्नं उपस्थित करण्यात आले होते. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, यामुळे महाविकास आघाडीच्या प्रतिमेला देखील धक्का पोहचला असल्याची चर्चा झालेली आहे त्यातून हा निर्णय घेतला जाऊ शकतो .

अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोललं जात आहे. वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही शिवसेनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी संबंधित मंत्र्यांना खातेबदलाबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याचे पंख छाटले जाणार आणि कुणाची वर्णी लागणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीत राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. विशेष करून सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला टिकेला सामोरं जावं लागतं आहे. या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे, त्यानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला होता. त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचा तपास ‘एनआयए’नं हाती घेतला आणि त्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. आता त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यातून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित देखील करण्यात आले आहे.

सचिन वाझे यांनी चौकशीत एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचंही नाव घेतलं आहे. वाझेंची अटक महाविकास आघाडी सरकारसाठी डोकेदुखी ठरली आहे. विरोधक हे सचिन वाझे यांच्या शिवसेनेशी असलेल्या संबंधांकडं बोट दाखवत आहेत. त्यामुळं शिवसेनेचीही गोची झाली आहे. निलंबित असलेल्या वाझे यांना पोलीस सेवेत घेतलेच कसे, असा प्रश्न केला जात आहे. गृहखातं अनिल देशमुख यांच्याकडं असल्यानं राष्ट्रवादीही विरोधकांच्या रडारवर आली आहे. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा यावर पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा झालेली असून डॅमेज कंट्रोल साठी महाविकास आघाडीकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


शेअर करा