महत्वाची बातमी.. सचिन वाझे यांच्या ‘ असल्या ‘ थिअरीवर एनआयएचा विश्वास नाही

शेअर करा

अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आता सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीत नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. एरवी बँकेत, दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे मोजण्यासाठी असे मशीन वापरले जाते. मात्र, सचिन वाझे आपल्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवत होते, याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतकी महागाची गाडी देखील सचिन वाझे यांना विकत घेणे आणि वापरणे कसे शक्य होत होते ? याचा देखील तपास यंत्रणा तपास करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या मर्सिडीज कारमध्ये जवळपास 5,75,000 लाखांची रोकड सापडली आहे. तसेच अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओची खरी नंबरप्लेट आणि आणखी काही बनावट नंबरप्लेटही या गाडीत सापडल्या आहेत. याशिवाय, मर्सिडीजमध्ये केरोसीनची एक बाटली सापडली आहे. या केरोसीनच्या साहाय्याने सचिन वाझे यांनी डोक्यावरील कॅप आणि फेसशिल्ड जाळले होते. मात्र, ते पीपीई किट जाळायला विसरले होते.

ज्याठिकाणी फेसशिल्ड आणि कॅप जाळण्यात आली त्याठिकाणी एनआयएची टीम तपासाला जाणार असल्याची माहिती आहे. सचिन वाझे यांना पीपीई किट घालून चालवायला लावण्यात येणार असल्याची देखील बातमी आहे, जेणेकरून अंबानींच्या निवासस्थानाबाहेरील पीपीई किट घालून चालणारी व्यक्ती कोण होती याचा तपास लागू शकेल. पीपीई किट घालून चालणारी व्यक्ती सचिन वाझे आहेत हे सिद्ध झाले तर वाझे यांची उलटी गिनती सुरु झाली असे म्हणता येईल.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून क्राईम इंटेलिजन्स युनिट विभागात चालक म्हणून काम करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवताना अनेक गाड्यांचा आणि नंबरप्लेटसचा वापर झाला होता. दोन गाड्या स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. तर सचिन वाझे स्वत: दोन मर्सिडीज कार वापरत असल्याचे निष्पन्न झाले होते. सचिन वाझे यांनी जिलेटीन कुठून आणि कोणत्या गाडीतून आणले, याचा ‘एनआयए’कडून युद्धपातळीवर तपास सुरु असल्याचे समजते.

एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झाल्याने गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी आणि स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी सचिन वाझे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट रचल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे.सचिन वाझे यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते. ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस दलात गेलेली आपली पत पुन्हा मिळवायची होती. त्यामुळे सचिन वाझे यांनीच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी ठेवली. त्यानंतर याप्रकरणाचा यशस्वीपणे माग काढल्याचे श्रेय त्यांना मिळवायचे होते, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, एनआयएला सचिन वाझे यांच्या या थिअरीवर विश्वास नसल्याचेही समजते.

ख्वाजा युनूस प्रकरण काय आहे ?

2 डिसेंबर 2002मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर 39 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत काम करत होता. त्याला पोटाही लावण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा धक्कादायक दावा पोलिसांनी दावा केला होता.

कोर्टाने युनूस प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. युनूसला तुरुंगात कपडे काढून पट्ट्यांनी मारहाण केल्याचं एका साक्षीदाराने कोर्टाला सांगितलं होतं. या प्रकरणी एकूण 14 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं होतं. मात्र, खटला केवळ चार पोलीस अधिकाऱ्यांवर चालवण्यात आला होता. त्यात वाझेसह तीन कॉन्स्टेबलचा समावेश होता. या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. दरम्यान सचिन वाझे हे शिवसेनेत दाखल झाले.

भाजपाला राज्यात हरवलेला सूर सापडला ?

सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली असून भाजपचा राज्यात गेलेला सूर पुन्हा सापडल्याचे चित्र आहे . राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून ‘एनआयए’ला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून आणखी बरीच माहिती समोर येईलच, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील आता मोठा दावा करण्यात आला आहे.

भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली सचिन वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावादेखील भाजपाने केला आहे. भाजपाच्या या दाव्यानंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल यावर महाविकास आघाडीत देखील बैठकांना जोर आला आहे .

सचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे लवकरच लावली जातील, असे सुत्रांनी सांगितले. सचिन वाझे यांनी गंभीर गुन्ह्याच्या कामात पोलीस वाहने, आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यंत्रणेचा सर्रास वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते.

अटकेतील सचिन वाझे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. एनआयएच्या कारवाईवर आक्षेप घेणारे वाझे यांचे तीन अर्ज आज एनआयए कोर्टाने फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे निलंबित वाझे जिथे सेवेत होते त्या क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिट कार्यालयाची एनआयए टीमने झडती घेतली. तिथून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असून लॅपटॉप, आयपॅड, मोबाइलही तपासण्यात आले आहेत.


शेअर करा