महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू..पतीच्या ‘ वेगळ्याच ‘ दाव्याने गूढ वाढले

शेअर करा

सोलापूर शहर पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे . एका बस स्थानकावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचारी सोलापूरच्या ग्रामीण भागातील हगलूर गावातील बस स्थानकावर बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यानंतर त्यांना सोलापुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे.

मृत महिलेच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरिक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली आहे असे म्हटले आहे मात्र दुसरीकडे पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस तपासातच त्यांच्या मृत्यूमागील खरं कारण समजू शकणार आहे.

संबंधित महिला पोलीस कर्मचारी या सोलापूरमधील एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. त्या गेल्या 4 वर्षांपासून या पोलीस स्टेशनमध्ये रुजू होत्या. त्यांना एक मुलगा आणि पती असा परिवार आहे. पती खासगी कंपनीमध्ये नोकरीस आहेत. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी सोलापूर सिव्हिल रुग्णालयमध्ये एकच गर्दी केली होती. त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस अधिकार्‍यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मृत महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरीक्षकासोबत प्रेम संबंध असल्याचं सांगत त्या तणावातून आत्महत्या केल्याचा दावा केला आहे . पतीच्या म्हणण्यानुसार “एका पोलीस उपनिरिक्षकाने माझ्या पत्नीसोबत गोड बोलून प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्याबाबत आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही दोघांनाही समज दिली. मात्र, हा प्रकार त्या पोलीस अधिकाऱ्याकडून थांबला नाही. त्यामुळे माझी पत्नी त्यात अडकत गेली आणि त्या पोलीस अधिकाऱ्याकडून तिला खूप त्रास होत होता. त्यातूनच पत्नीने हे पाऊल उचललं.”


शेअर करा