‘ जिलेटीन कंपनीच्या व्यक्तीने राममंदिराला १५ कोटी दिले ‘ नागपूर कनेक्शनची चौकशी करा

शेअर करा

महाराष्ट्रातील वाझे प्रकरणाचे आज दिल्लीत पडसाद उमटले आहेत.काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत याबाबत मुद्दा उपस्थित केला, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, मात्र हे जिलेटिन कुठून आले आणि कोणत्या हेतूने ते देण्यात आलं होतं, याबाबत चौकशी का केली जात नाही? असा प्रश्न कुमार केतकरांनी राज्यसभेत उपस्थित केला आहे .

कुमार केतकर म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात २ प्रकरण गाजत आहेत, त्यात स्थानिक पोलीस आणि एनआयए तपास करत आहेत, एक म्हणजे लोकसभेचे विद्यमान खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली, डेलकर हे ७ वेळा खासदार राहिले होते, त्यांच्या सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे मोहन डेलकरांनी मुंबईत आत्महत्या केली कारण त्याचं दीव-दमण आणि इतर राज्यातील सरकारवर विश्वास नव्हता असं त्यांनी सांगितलं.

दुसरी घटना मनसुख हिरेन यांचा मृत्यू…प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. मात्र या प्रकरणात ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटिन तयार झाले, ज्यांनी याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाही, या जिलेटिन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरासाठी १५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे जिलेटिन कोणी पुरवलं ? कोणत्या हेतूने हे जिलेटिन दिलं होतं ? याचीही चौकशी होणं गरजेचे आहे अशी मागणी कुमार केतकर यांनी राज्यसभेत केली.

एनआयएने ठाण्यातील साकेत सोसायटीत राहणारे वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निवासस्थानाची बुधवारी झडती घेतली. त्यांच्या पत्नी मोहिनी वाझे यांच्याकडे चार ते पाच तास चौकशी केल्याची माहिती आहे. वाझेंच्या मर्सिडीज बेन्झमध्ये सापडलेली पाच लाखांपेक्षा अधिक रोकड, इतर सामग्रीबाबत त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १.३०च्या सुमारास ठाण्यातील साकेत येथील बी-६ इमारतीमधील वाझेंच्या घरात झडती घेतली. मनसुख हिरेन आणि वाझे यांचे कसे संबंध होते? मनसुख यांच्या हत्येपूर्वी ते साकेत सोसायटीत आले होते का? वाझेंबरोबर काही वाद झाला होता का? अशा अनेक बाजूंनी वाझेंच्या कुटुंबीयांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते.

वाझे यांनी हा कट कोणाच्या सांगण्यावरून रचला, त्यांना २५ फेब्रुवारीला या तपासाचे अधिकार कोणी दिले, याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, सीआययूच्या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरूच आहे. सलग चौथ्या दिवशी साहाय्यक निरीक्षक रियाजुद्दीन काझी व प्रशांत होवाळे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. वाझेंच्या सांगण्यावरून अंबानींच्या घराच्या परिसरात स्कॉर्पिओ ठेवणे, इनोव्हातून प्रवास करणे, याबाबत विचारणा केली जात आहे.

सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून केला आहे .सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी फोटो ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, यावरून या प्रकरणाला आता वेगळे वळण येण्याची शक्यता असून पुन्हा राजकीय वातावरण आणखीनच तापणार असल्याचे दिसून येत आहे. मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचा फोटो आहे.

देवेन शेळके यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबाबतचे नियुक्ती पत्र सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तसेच, मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.

सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीत नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. एरवी बँकेत, दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे मोजण्यासाठी असे मशीन वापरले जाते. मात्र, सचिन वाझे आपल्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवत होते, याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतकी महागाची गाडी देखील सचिन वाझे यांना विकत घेणे आणि वापरणे कसे शक्य होत होते ? याचा देखील तपास यंत्रणा तपास करत आहेत.

सचिन वाझेंच्या मर्सिडीज कारमध्ये जवळपास 5,75,000 लाखांची रोकड सापडली आहे. तसेच अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओची खरी नंबरप्लेट आणि आणखी काही बनावट नंबरप्लेटही या गाडीत सापडल्या आहेत. याशिवाय, मर्सिडीजमध्ये केरोसीनची एक बाटली सापडली आहे. या केरोसीनच्या साहाय्याने सचिन वाझे यांनी डोक्यावरील कॅप आणि फेसशिल्ड जाळले होते.

ज्याठिकाणी फेसशिल्ड आणि कॅप जाळण्यात आली त्याठिकाणी एनआयएची टीम तपासाला जाणार असल्याची माहिती आहे. सचिन वाझे यांना पीपीई किट घालून चालवायला लावण्यात येणार असल्याची देखील बातमी आहे, जेणेकरून अंबानींच्या निवासस्थानाबाहेरील पीपीई किट घालून चालणारी व्यक्ती कोण होती याचा तपास लागू शकेल. पीपीई किट घालून चालणारी व्यक्ती सचिन वाझे आहेत हे सिद्ध झाले तर वाझे यांच्या अडचणी आणखीणच वाढणार आहेत.

सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली असून भाजपचा राज्यात गेलेला सूर पुन्हा सापडल्याचे चित्र आहे . राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून ‘एनआयए’ला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून आणखी बरीच माहिती समोर येईलच, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील आता मोठा दावा करण्यात आला आहे.

भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली सचिन वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावादेखील भाजपाने केला आहे. भाजपाच्या या दाव्यानंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल यावर महाविकास आघाडीत देखील बैठकांना जोर आला आहे .

सचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे लवकरच लावली जातील, असे सुत्रांनी सांगितले. सचिन वाझे यांनी गंभीर गुन्ह्याच्या कामात पोलीस वाहने, आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यंत्रणेचा सर्रास वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते.


शेअर करा