पुण्यात कोरोनाचे थैमान.. जाणून घ्या आताची परिस्थिती ?

 • by

अनलॉकनंतर वाढलेली गर्दी, ठिकठिकाणी होणारा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, विनामास्क लोकलमध्ये वावर यांसह इतर कारणांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा विस्फोट पाहायला मिळत आहे. रुग्णांचा चढता आलेख पाहून राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे राज्य सरकारकडून ठिकठिकाणी निर्बंध लावले जात आहेत

राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल 25 हजार 681 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21 लाख 89 हजार 965 इतकी झाली आहे. तर काल राज्यात कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण 53 हजार 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात एकूण 14 हजार 400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या कोरोना नव्या सूचना

 • राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवा
 • नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के संख्या असावी
 • आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं
 • सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
 • धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही

पुण्यातील कोरोना परिस्थिती भयावह

पुणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 2872 नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात दिवसभरात एकूण 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या पुण्यात 499 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात दिवसभरात 808 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला. १७ मार्च रोजी सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.

काल आढळलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांना मिळून पुण्यात एकूण 18888 रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात मृतांचा आकडा 5016 वर पोहोचला आहे. हा आकडा चिंताजनक असल्याचे म्हटले जाते आहे. देशातील 13 टक्के कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. गेल्या महिन्याभरापासून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सुदैवाने आतापर्यंतचा सर्वांत कमी मृत्यूदर हा पुण्याचा आहे.

देशात सद्यःस्थितीत 2 लाख 68 हजार 805 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 62 टक्के म्हणजे 1 लाख 66 हजार 353 कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्या खालोखाल केरळमध्ये 9.4 टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत. देशाच्या तुलनेत 13 टक्के आणि राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत 21 टक्के (35 हजार 539) कोरोना रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत.

पुण्यात गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार आहे. पुण्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्याने धास्तावलेल्या पालिकेने आता पुन्हा आपली यंत्रणा बाजारपेठांमध्ये उतरवली आहे. त्यामुळे तेथील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दुकाने, हॉटेल, मॉल व अन्य गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार आहे. ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यापासून मास्क नसलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे. पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन करीत आपापल्या हद्दीत खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठीची क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे. यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांपासून त्यांच्याकडील आरोग्य खात्याची टीम पूर्णवेळ काम करणार आहे.

पुण्यात काय सुरु, काय बंद ?

 • पुण्यात लॉकडाऊन नाही
 • पुणे शहरात रात्रीची संचारबंदी
 • पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू
 • लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी
 • 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
 • हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
 • उद्यान एकवेळ बंद राहणार