” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत

  • by

कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने आज ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा देत आंदोलन करण्याचे ठरवले होते मात्र ह्या आंदोलनाला मोजके नेते वगळता कोणाचाच प्रतिसाद लाभला नाही. भाजपाच्या नेत्यांनी आज आपापल्या घरासमोर निदर्शनं केली मात्र जनतेने ह्या आंदोलनाकडे पाठच फिरवली . काळ्या फिती लावून, काळे झेंडे उंचावून भाजपचे नेत्यांनी सरकारचा निषेध केला मात्र आंदोलन कितपत यशस्वी झाले यावरून आता पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यात शाब्दिक चकमक सुरु झाली असून संजय राऊत यांनी भाजपाच्या या निदर्शनांची खिल्ली उडवली आहे.

संजय राऊत म्हणाले, ” भाजपाचं आंदोलन पूर्णतः फसलंय. त्यात केवळ भाजपा नेते होते. जनता त्यात सहभागी झालीच नाही. किंबहुना आज तर आकाशात काळे कावळेही दिसले नाहीत.. त्यांचं ते काळं आंदोलन आहे ना?. बहुतेक आज कावळे घरट्यांमध्ये बसलेत. त्यांच्यावर कुठला ठपका नको म्हणून.. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा यांनी काळ्या चड्ड्या, काळे बनियन घालून आंदोलन केलं असतं तर महाराष्ट्रानं त्यांची पाठ थोपटली असती ” असा टोलाही त्यांनी लगावला.

कोरोना संकटात विरोधी पक्षच अपयशी ठरलाय आणि म्हणून ते स्वतःच स्वतःविरोधात आंदोलन करत आहेत. सरकार अपयशी ठरलंय असं या काळात सांगणं महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण एक युद्ध लढतोय. त्यात पुढे जात असताना अशा प्रकारे अडथळे निर्माण करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही, असे देखील संजय राऊत पुढे म्हणाले.

दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ” सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू! आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली, शासनाची निष्क्रियता! राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली. मात्र जनता सहन तरी किती करणार?” असे ट्विटरवर लिहत आपल्या आंदोलनाचे फोटो शेअर केले आहेत .


इतर संबंधित बातम्या

सर्वच काळे करा म्हणजे येड्यांची जत्रा : सामनामधून भाजपचा जबरदस्त समाचार
https://nagarchaufer.com/?p=39

गुजरातमध्ये देखील लागल्या लांब लांब रांगा मात्र दारूसाठी नव्हे तर चक्क … ?
https://nagarchaufer.com/?p=42