पुराव्यासहीत : परमबीर सिंह यांनी केलेला दावा खोटा ? कारण त्यावेळी गृहमंत्री …

शेअर करा

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला होता . अनिल देशमुख यांनी दावा फेटाळला असून वाझेप्रकरणी होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी सिंग यांनी खोटे आरोप केले आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे .

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकारण तापलेले पहायला मिळत आहे. भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे होत आहे. अशावेळी आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर पलटवार केलाय. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठीच भाजपनं हे कुभांड रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे .

परमवीर सिंह यांनी ‘अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना दरमहिना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं,’ असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मात्र परमवीर सिंह यांनी आरोप करताना अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या एका दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही कागदपत्रे CNN News18 च्या हाती लागली असून त्यांनी ती प्रसिद्ध केली आहेत. परमवीर सिंह यांच्या दाव्यानुसार अनिल देशमुख यांनी वाझेंना फेब्रुवारीच्या मध्यावर शासकीय निवासस्थानावर बोलवले होते मात्र दिनांक ५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आलेले होते.

परमवीर सिंह यांच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईत भेटायला बोलावलं. मात्र ज्या दिवशी ( फेब्रुवारीच्या मध्यावर ) सचिन वाझे यांना देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे, त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत होते आणि कोरोनाची लागण झाल्याने विलगीकरणात होते, असं उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे.

अनिल देशमुख यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आले असल्याचे देखील म्हटलेले आहे. सदर कागदपत्रांमुळे आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांच्या दाव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सदर कागदपत्रे समोर आल्यानंतर अद्याप परमवीर सिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

परमबीर सिंग यांच्या दाव्यानंतर नेहमीप्रमाणे विरोधकांनी त्याचा राजीनामा मागायला सुरु केलं असल तरी परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतरच हे सर्व आरोप केलेले असल्याने नाराजीची किनार देखील त्याला असण्याची शक्यता आहे. ज्या वृत्तवाहिन्यांवर हे चित्र रंगवले जात आहे आणि देशमुख आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला आरोपी ठरवले जात आहे, त्यांच्या निष्ठा आणि निःपक्षपाती पणाबद्दल देखील विश्वासाची परिस्थिती नाही. त्यामुळे येत्या काळात काय होते हे पाहावे लागेल.

अनिल देशमुख यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं?

‘मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे,’ असा दावा अनिल देशमुख यांनी ट्वीट करत केला होता. अनिल देशमुख यांनी एकदा काय ती चौकशी होऊन जाऊद्याच, असेही म्हणत भाजपला आव्हान दिले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही मुद्दे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडले आहेत त्यात , ” मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री. परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल” असे म्हटलेले आहे.

अनिल देशमुख यांनी मांडलेले मुद्दे

1) सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?
2) आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता.
3) या chat च्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?
4) 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
5) पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.
6) परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.
7) स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.
8) सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
9) विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.
10) स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षड्यंत्र आहे.


शेअर करा